FIR Against Amazon: ॲमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची नियमबाह्य पद्धतीने विक्री; अन्न व औषध प्रशासनाने दाखल केला गुन्हा

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ज्या औषधांची विक्री करणे रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, अश्या गर्भपाताच्या औषधाची सर्रास विना प्रिस्क्रीप्शन विक्री ॲमेझॉनद्वारे केल्या गेली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी (Abortion) वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. ॲमेझॉन (amazon.in ) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्रँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. या औषधाची मागणी amazon.in द्वारे डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शनची मागणी न करता स्वीकारली गेली व हे औषध कुरियरने प्राप्त झाले. या कुरियर पार्सलसोबत औषध विक्रीचे बिल प्राप्त झाले नाही.

या औषधाच्या विक्री प्रकरणात प्रशासनाने ॲमेझॉन सेलर्स सर्विसेसला माहिती विचारणा केली असता या औषधे ओरिसा येथून पुरवठा करण्यात आल्याचे कळविण्यात आले. ॲमेझॉनने पुरविलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासात ओरिसा येथील विक्रेत्याने सदर औषध पुरविले नसून, त्याचे औषध विक्री दुकानाचे कागदपत्रे वापरून सदर औषध विक्रीसाठी इतर  व्यक्तीने ॲमेझॉनच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे आढळून आले.

MTP kit हे औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 व नियमांतर्गत अनुसूची H प्रवर्गातील औषध असून त्याची विक्री केवळ पंजीकृत वैद्यकीय व्यवसायिकाच्या प्रिस्क्रीप्शन वरच करणे बंधानकारक आहे. तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा, 2002 व नियम, 2002 नुसार सदर औषधाचा वापर अधिकृत आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी व सेवा पुरविणाऱ्याच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात येणे बंधनकारक आहे.

amazon.in या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या वस्तूच्या यादीत औषधे घटक अंतर्भूत नाही. या प्रकरणात ॲमेझॉनने  त्यांच्या माध्यमातून औषधे  विक्री करण्यास नोंदणी करणाऱ्या संस्था/व्यक्ती यांची शहानिशा केली नाही. amazon.in या ऑनलाईन पोर्टलवर सदर विक्रेत्याने MTP kit या गर्भपातासाठी वापरत येणाऱ्या औषध प्रकारचे नाव न देता ब्रांड नावाने (A-Kare tablets) विक्रीसाठी नोंदणी केली. औषधांच्या  विक्रीसाठी प्रचलित  कायदे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे या बाबत खात्री ॲमेझॉनद्वारे करण्यात आली नाही.

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ज्या औषधांची विक्री करणे रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, अश्या गर्भपाताच्या औषधाची सर्रास विना प्रिस्क्रीप्शन विक्री ॲमेझॉनद्वारे केल्या गेली आहे. वरील प्रकरणी A-Care या ब्रांड नावाने गर्भपाताच्या औषधाची विक्री संबंधित विक्रेत्याने व amazon.in  यांनी संगनमताने करून भारतीय दंड  संहिता, 1860 औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 व नियम, 1945 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत Intermediaries साठी असणाऱ्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले. (हेही वाचा: भारतातील शैक्षणिक संस्था आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मना सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका; अहवालात धक्कादायक खुलासा)

यामुळे amazon.in या ऑनलाईन विक्री पोर्टल व संबंधित विक्रेत्याविरुद्ध  खेरवाडी पोलीस स्टेशन बांद्रा (पूर्व) येथे  भारतीय दंड संहिता, 1860 व माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 सहवाचन औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या विविध कलमाखाली दि. 29-4-2022 रोजी औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) मुख्यालय द्वारे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांद्वारे करण्यात येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now