Weather Forecast: पोषक वातावरण, महाराष्ट्रात पाऊस परतीची शक्यता
पावसाची उघडीप खंडीत होऊन हाच पाऊस पुन्हा परतणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.
Monsoon Weather in Maharashtra: मान्सून यंदा काहीशा उशीरा सुरु झाला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर कुठे अगदीच थोडासा बरसला. लगेच गायबही झाला. ऐन पावसाळ्यातही अनेक ठिकाणी साधा शिडकावही पाहायला मिळाला नाही. त्यामुळे दडी मारुन बसलेला वरुणराजा पुन्हा बरसणार की नाही या चिंतेत नागरिक आहेत. मात्र, चिंता करु नका, हवामान विभागाने काहीशी दिलासादायक माहिती दिली आहे. निसर्गात होणाऱ्या बदलामुळे पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 13 ऑगस्टपासून पुन्हा मेघराजाची कृपा होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
साधारण 13 ऑगस्टपासून तयार होत असलेले पोषक वातावरण पावसासाठी फलदायी ठरले. परिणामी 15 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सरी बरसू लागतील, असा अंदाज आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये निसर्गाचे गणित बदलले आहे. त्यामुळे पर्जन्यवृष्टीचे प्रमाण असमान तर आहेच. परंतू त्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी शून्य प्रमाणात पाऊस बरसत आहे. वास्तविक पाहता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी दाखल होणारा मान्सून यंदा प्रत्यक्षात जुलै महिन्याच्या मध्यावर उपस्थित झाला. पण पुढचे केवळ एकदोन आठवडे नाममात्र बरसून तो ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात गायब झाला. पावसाचा जोर पूर्ण ओसरला.
राज्यात ऑगस्ट महिन्यात बरसलेल्या पावसाबद्दल सांगायचे तर साधारण चार तारखेपासून पावसाने पाठ फिरवली आहे. अगदीच अत्यल्प प्रमाणात कुठेतही एखादी सर किंवा शिडकाव पाहायाल मिळतो आहे. पाठिमागच्या दोन दिवसांमध्ये तर पाऊस पूर्ण थांबला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा लवकर सुरु होणार का? असाही सवाल विचारला जातो आहे. इतकेच नव्हे तर ऑगस्ट महिन्यातच उकाडा जाणवू लागला आहे.
दरम्यान, IMD ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 14 ऑगस्टपर्यंत उत्तराखंड, पूर्व यूपीच्या उत्तरेकडील भागात एकाकी तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 13 ऑगस्ट रोजी पंजाब आणि हरियाणा आणि 14 ऑगस्टपर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये तीव्र पावसाची शक्यता आहे.