आपल्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने जन्मदात्या पित्यानेच केली गर्भवती मुलीची हत्या
काळीज पिळवटून टाकणारी ही घटना मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात घडली.
आपण आणलेली स्थळ नाकारून आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात ठेवून जन्मदात्या पित्यानेच आपल्या 5 महिन्याच्या गर्भवती मुलीची हत्या केली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) परिसरात घडली. राजकुमार चौरसिया (Rajkumar Chaursiya) असे आरोपीचे नाव असून घाटकोपर पोलिसांनी त्यांना अटक केली. मीनाक्षी ब्रिजेश चौरसिया (20) असे मृत तरुणीचे नाव असून तिने वडिलांनी जमवलेली 2 लग्न मोडीत काढून त्यांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
मीनाक्षी ही घाटकोपर पश्चिमेकडील शिवपुरी चाळीत राहत होती. तिने ब्रिजेश चौरसिया या तरुणाशी प्रेमविवाह केला होता आणि फेब्रुवारी महिन्यात ती उत्तरप्रदेश येथून मुंबईत आली होती. घाटकोपर पश्चिमेकडील मधुबन टोयाटो शोरुमसमोरील रस्त्यावर रविवारी सकाळी मीनाक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सापडली. याबाबत माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिला राजावाडी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मीनाक्षीला मृत घोषित केले.
हेही वाचा- शिर्डी पाठोपाठ नवी मुंबई आणि नागपूर मध्ये हत्याकांड, पोलीस तपास सुरु
पोलीस चौकशीत मीनाक्षीच्या वडिलांनी आपणच तिची हत्या केल्याचे कबूल केले. . मीनाक्षीचे तिच्याच गावातील ब्रिजेश या तरुणाशी प्रेम संबंध होते. हे प्रेम संबंध राजकुमार यांना मान्य नव्हते. त्यांनी दोन वेळा मीनाक्षीचे लग्न इतर ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मीनाक्षीने दोन्ही वेळा लग्नास नकार दिला होता. तोच राग मनात ठेवून तिची हत्या केल्याचे राजकुमार चौरसिया यांनी सांगितले.
मीनाक्षीच्या पतीला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने राजकुमार यांच्याकडे पैशांची मदत मागितली. त्यानुसार त्यांनी मीनाक्षीला फोन करुन घरी बोलावले. आणि योग्य संधीचा फायदा घेऊन त्यांनी मीनाक्षीवर चाकूने वार केले. लग्नाआधी गरोदर राहिल्याने राजकुमार यांच्या मनात राग होता.