कोल्हापूर येथे भीषण अपघात; गाडी डोहात बुडून पाच ठार, दोन जखमी
या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहे
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रेडीडोह जवळ तवेरा गाडीचा टायर फुटून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक जखमी झाले आहे. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश असून, एकाच कुटुंबातील 3 महिलांनी या अपघातात आपला जीव गमावला आहे.
या गाडीतून प्रवास करणारे तांदळे कुटुंबीय रत्नागिरी आणि मार्लेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. घरी परतत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा मार्गावरील जोतिबा फाटा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या तवेरा गाडीचा पाठीमागील टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार जवळच्या रेडे डोहात जाऊन कोसळली. डोहात गाडी बुडाल्याने यातील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त मोटारीतील अन्य काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहिम सुरु आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या प्रवाश्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच अपघाताताील जखमींना उपचारासाठी तातडीने कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल करण्यात आले आहे.