Fast-Track DNA Testing Units: महिला व बालकांसंदर्भातील गुन्ह्यांच्या तपासाला येणार गती; सीएम उद्धव ठाकरे यांनी केली तीन फास्ट ट्रॅक डीएनए चाचणी युनिटची सुरुवात
राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या कामात हे युनिट मोठी भूमिका बजावणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी निर्भया योजनेअंतर्गत मानवी डीएनए नमुन्यांची चाचणी करण्यासाठी तीन फास्ट ट्रॅक डीएनए चाचणी युनिटची (Fast-Track DNA Testing Units) सुरुवात केली आहे. यामुळे गुन्हेगारी तपासाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत रहाटे कॉलनीस्थित प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘महिला व बालक यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजीवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखताना, अशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा कामी येणार आहे. आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज फास्टस्ट्रॅक मुंबई, नागपूर, पुणे येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीस, मुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईल.’
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘महिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीने शक्ती कायदा तयार केला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाणार आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहे.’ या युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचूकता येणार आहे. (हेही वाचा: Pune Corona Update: पुणे जिल्हा प्रशासनाने दिवाळी पहाट कार्यक्रमांना दिली परवानगी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती)
या युनिटमध्ये वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागही सुरू होणार आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या कामात हे युनिट मोठी भूमिका बजावणार आहे.