Farmers Scheme: शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे मिळणार सर्व योजनांचा लाभ; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळणार आहे. महाडीबीटी या पोर्टलवर हे सर्व लाभ मिळणार आहेत. यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत.

Farmers Scheme: शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे मिळणार सर्व योजनांचा लाभ; 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
कृषीमंत्री दादाजी भुसे (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळणार आहे. महाडीबीटी या पोर्टलवर हे सर्व लाभ मिळणार आहेत. यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.

त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज या पोर्टलवर करायचा आहे.

अशी करा नोंदणी –

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. (हेही वाचा: मुंबई मेट्रो कार शेड BKC मध्ये करण्याचा सल्ला देणारे सरकार आणि महाराष्ट्राला बुडवतील: देवेंद्र फडणवीस)

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली असून यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही, असेही सांगण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2020 06:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).