मुंबईतील प्रसिद्ध विब्स ब्रेडचा पुरवठा का एकाएकी झाला गायब? ही आहेत त्यामागची कारणे

जवळपास आठवड्याभरापासून मुंबईत विब्स ब्रेड चे पॅकेट दिसेनासे झाले आहे. कारण 19 सप्टेंबरपासून विब्स ब्रेडचा पुरवठा बंद करण्यात आला आहे

Wibs Bread (Photo Credits: Instagram)

मुंबईतील (Mumbai) खूप जुना आणि प्रसिद्ध 'विम्ब ब्रेड' (Wibs Bread) चा पुरवठा अचानक बंद झाला आहे. जवळपास आठवड्याभरापासून मुंबईत विब्स ब्रेड चे पॅकेट दिसेनासे झाले आहे. कारण 19 सप्टेंबरपासून विब्स ब्रेडचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. याचा परिणाम मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सॅन्डविचच्या व्यवसायावर झाला आहे. मुंबईत सँडविचसाठी विब्स च्या ब्रेडला जास्त मागणी असते. मात्र अचानक याचा पुरवठा बंद झाल्याने सँडविच वाले मोठ्या अडचणीत आले आहेत. विब्स च्या मालकांच्या कौटुंबिक कलहामुळे ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई शहरात 1973 पासून विब्स ब्रेडचा पुरवठा सुरू होता. मात्र, आता पश्चिम भारत बेकर्सचे (Wibs) मालक असलेल्या ईराणी कुटुंबात वाद सुरू आहेत. तिघा भावांमधील भागीदारीवरून हा वाद सुरू असून, हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेलं आहे. त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम सर्वत्र पडला आहे. त्यामुळे मुंबईत सॅन्डविचवाल्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आला आहे.

हेही वाचा- गोव्यात ब्रेड स्लाईसच्या पाठोपाठ आता पावही महागणार, 10 ऑक्टोबरपासून होणार नवीन दर लागू

विब्स ब्रेडचे मुख्यालय डॉकयार्ड रोड येथे असून, शहरात काही ठिकाणी कंपनीचे कारखाने आहेत. विब्समध्ये जवळपास ३ हजार लोक काम करतात. इथे ब्रेड, ब्राऊन ब्रेड, हनीबेल केक, टुटी फ्रुटी बन्स आणि पाव अशी ९ उत्पादने तयार होतात. मुंबईतील ९० टक्के सॅन्डविचवाले विब्स ब्रेडचा वापर करतात. इतर ब्रेड कंपन्यांच्या तुलनेत हा ब्रेड फारच मऊ आणि चवदार असतो. त्यामुळे बाजारात विब्स ब्रेडसाठी लवकर दुसरा पर्याय उपलब्ध होणं कठीण आहे.

विब्स ब्रेड बंद झाल्याने  मुंबईतील खवय्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. तसेच विब्स चे उत्पादन बंद झाले तर त्याचा फटका तेथे काम करणा-या 3000 लोकांच्या कुटूंबाला बसणार आहे. त्यामुळे विब्सचे उत्पादन पुन्हा एकदा सुरू व्हावे, अशी मागणी देखील अनेकजण करत आहेत.