Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग; परिसरात धुराचे लोळ,अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Photo Credit -X

Dombivli MIDC Fire: डोंबिवली परिसरातील एमआयडीसी भागात एका कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग(Dombivli MIDC Fire) लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत आग लागली. कापड प्रिटींगसाठी लागणाऱ्या केमिकल (Textile Printing Chemical Company)कंपनीत ही घटना घडली. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. यामुळे डोंबिवली पुन्हा हादरली आहे. (हेही वाचा:Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवली मध्ये MIDC भागातील एका फॅक्टरी मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने भडकली आग (Watch Video) )

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या फेज 2 मध्ये भीषण आग लागली आहे. न्यू अॅग्रो केमिकल असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीत कापड प्रिटींगसाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जाते. दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. कॅमिकल असल्यामुळे काही मिनिटातच ही आग सर्वत्र पसरली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे तेथे भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीच्या घटनेवेळी तेथे 6 कामगार काम करत होते. सुदैवाने ते सर्व सुखरुप आहेत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान याआधीही डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत जखमी झालेल्यांची संख्याही जास्त होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.