धक्कादायक! पुण्यातील ससून रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल
मृतदेहाची अदलाबदल झाल्यामुळे नातेवाईकांनी चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
पुण्यातील ससून रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतदेहाची अदलाबदल झाल्यामुळे नातेवाईकांनी चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. शनिवारी दोन महिला रुग्णांचे मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेच्या नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करताना ही घटना उघडकीस आली. परंतु, तोपर्यंत पहिल्या कुटुंबीयांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले होते. याअगोदरदेखील ससून रुग्णालयात मृतदेह अदलाबदल होण्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एका नातेवाईकांना दोन वेळा अंत्यसंस्कार करावे लागले. तसेच दुसऱ्या कुटुंबीयांना चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने केवळ अस्थी घ्याव्या लागल्या. (हेही वाचा - धक्कादायक! सात वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन डोक्यात दगड धालून केली मुलीची निर्घृण हत्या; चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय)
दोन महिला मृतांपैकी एका महिलेच्या मुलाने सकाळी साडेआठ वाजता ससून रुग्णालयातील शवागारात येऊन आईचा मृतदेह ओळखला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याने तो मृतदेह ताब्यात घेतला. रात्री साडेअकरा वाजता दुसऱ्या मृत महिलेचे कुटुंबीय रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले. त्यावेळी तो मृतदेह त्यांच्या घरातील महिलेचा नसल्याचा दावा कुटुंबातील सदस्यांनी केला. मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्या कुटुंबीयांच्या ताब्यात अगोदर मृतदेह देण्यात आला होता, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु, तोपर्यंत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, असं ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असंही तांबे यांनी सांगितलं.