Mumbai: मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी जवानाला अटक

बीड पोलीस फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या स्थानिक राजकारण्यांवर कारवाई करत नव्हते. वैतागून मुंडे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मरीन ड्राइव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) गुरुवारी पहाटे एका माजी जवानाला अटक केली. प्राप्त माहितीनुसार, ही व्यक्ती मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे प्रशासकीय मुख्यालय मंत्रालय (Mantralaya) येथे आत्महत्या (Suicide) करणार होता. सुरेश मुंडे (Suresh Munde) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. फसवणुकीच्या प्रकरणामुळे सुरेश मुंडे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

मुंडे हे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बीड पोलीस फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या स्थानिक राजकारण्यांवर कारवाई करत नव्हते. वैतागून मुंडे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा -Mantralaya Updates: मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळल्याने खळबळ, राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश)

तथापि, प्रशासनाच्या दिरंगाई किंवा निष्क्रियतेच्या निषेधार्थ मंत्रालयात कोणीतरी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. नांदेडच्या एका कंत्राटदाराने पत्नीसह गेल्या वर्षी मे महिन्यात मंत्रालयाबाहेर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

तसेच पुण्यातील एका शेतकऱ्याने ऑगस्ट 2021 मध्ये एमव्हीए सरकार सत्तेवर असताना मंत्रालयाच्या गेटबाहेर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुभाष जाधव यांनी आपली जमीन काही लोकांनी बळकावली असल्याची तक्रार पोलिसात केली होती. पोलिसांच्या निष्क्रियतेनंतर त्यांनी मंत्रालयात येण्याचा निर्णय घेतला. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घ्यायची होती, मात्र त्यांना मंत्रालयात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे त्यांनी वैतागून मंत्रालयाबाहेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.