मुंबई: माजी सैन्य अधिकाऱ्याच्या मुलावर बांद्रा येथील पबमध्ये हल्ला; 3 जण अटकेत
याप्रकरणी बांद्रा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
माजी सैन्य अधिकाऱ्याच्या मुलावर मुंबईतील एका पबमध्ये हल्ला करण्यात आला. याप्रकरणी बांद्रा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांद्रा येथील एका पबमध्ये शनिवारी (2 मार्च) हा धक्कादायक प्रकार घडला. गुरिनहाल सिंग (Gurnihal Singh) असे या 22 वर्षीय मुलाचे नाव असून तो कॉलेजात शिकतो. शौर्यचक्र पुरस्कार विजेते निवृत्त कॅप्टन बिक्रमजीत सिंग (Bikramjit Singh) यांचा तो मुलगा आहे. गुरिनहाल आणि त्याचा मित्र सक्षम जातिया (Saksham Jatia) या दोघांवर एका टोळीने हल्ला केला. पबमध्ये डान्स करण्यावरुन झालेल्या वादावादीत हा प्रसंग उद्भवला.
टोळीतील एका व्यक्तीने सक्षम जातियावर हल्ला केल्यानंतर वादाला गंभीर रुप प्राप्त झाले. मित्राला वाचवण्यासाठी गुरिनहाल आणि त्याचे मित्र मध्यस्थी करु लागले असता टोळीने त्यांच्यावरही हल्ला चढवला.
या वादाला इतके गंभीर स्वरुप प्राप्त झाले की, टोळीतील एका व्यक्तीने दारुची बाटली फोटली आणि गुरिनहालच्या घशात खुपसली. यात गुरिनहाल गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यानंतर गुरिनहाल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता हळूहळू त्याची प्रकृती सुधारत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तिघांना वेगवेगळ्या दिवशी अटक केली असून त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत असून यात अजून कोणाचा हात आहे का, याचा तपास केला जात आहे.