Ellora Caves: औरंगाबादच्या वेरूळ लेणी येथे बसवली जाणार Hydraulic Lift; अशी लिफ्ट असलेले देशातील पहिले स्मारक
त्याच वेळी, एएसआयने संरचनेच्या दोन्ही बाजूंना लहान लिफ्ट्स बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. येथे या लिफ्ट्स बसवण्यासाठी कोणतेही नवीन बांधकाम केले जाणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात स्थित युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या वेरूळ लेणी (Ellora Caves) येथे हायड्रोलिक लिफ्ट (Hydraulic Lift) बसवण्यात येणार आहे. यासोबतच अशाप्रकारची लिस्ट असलेले ते देशातील पहिले स्मारक असेल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. औरंगाबाद शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर, वेरूळ येथे सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. या परिसरात हिंदू, बौद्ध आणि जैन शिल्पे आहेत.
मिलन कुमार चौले, अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, औरंगाबाद परिमंडळ म्हणाले, ‘एएसआय 500 मीटर अंतरावर पसरलेल्या वेरूळ लेण्यांना पर्यटकांसाठी अधिक अनुकूल बनवण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेत आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याच्या किंवा ते पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहेत. मंदिर संकुलातील 34 लेण्यांपैकी 16 क्रमांकाची लेणी अत्यंत महत्त्वाची आहे. कैलास गुफा या नावाने प्रसिद्ध असलेली जागा दोन मजली आहे. या ठिकाणी पर्यटकांना गुहेतून वर पायऱ्या चढून जावे लागते.
गुहेत व्हीलचेअरच्या सुरळीत हालचालीसाठी पायऱ्या आणि रॅम्प बनवण्यात आले आहेत. त्याच वेळी, एएसआयने संरचनेच्या दोन्ही बाजूंना लहान लिफ्ट्स बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे. येथे या लिफ्ट्स बसवण्यासाठी कोणतेही नवीन बांधकाम केले जाणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. येथे बसविण्यात येणारी यंत्रणा लहान असेल, ज्याचे क्षेत्रफळ 9 चौरस फूट असेल. यामध्ये व्हीलचेअर असलेली व्यक्ती पहिल्या मजल्यावर सहज जाऊ शकते. यामुळे एएसआय अंतर्गत वेरूळ हे देशातील पहिले जागतिक वारसा स्थळ बनणार आहे, जिथे लिफ्टची सुविधा असेल. (हेही वाचा: टाईमने जाहीर केली जगातील 'सर्वोत्तम 50 ठिकाणांची' यादी; भारतातील 'या' दोन स्थळांचा समावेश, जाणून घ्या लिस्ट)
उच्च अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली होती. वरून कैलास लेणीही पर्यटकांना पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कैलास लेणी ही डोंगरांनी वेढलेली रचना असून त्यासाठी वरच्या टेकडीवर एक मार्ग तयार करण्यात येणार आहे. अधिका-याने सांगितले की एएसआय काही पेंटिंग्जसाठी प्रकाशयोजना बसवण्याचा आणि काही भागांवर संवर्धन करण्याचे काम करत आहे.