महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग दुपारी घेणार पत्रकार परिषद
या पत्रकार परिषदेतच निवडणूक आयोग विधानसभा निवडणूक वेळापत्रक आणि निवडणुका पार पडत असलेल्या राज्यांमध्ये आदर्श अचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Maharashtra Assembly Elections 2019: भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) महाराष्ट्र, हरियाणा (Haryana Assembly Elections) आणि झारखंड (Jharkhand Assembly Elections) अशा तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा आज (शनिवार, 21 सप्टेंबर 2019) करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या पत्रकार परिषदेतच निवडणूक आयोग विधानसभा निवडणूक वेळापत्रक आणि निवडणुका पार पडत असलेल्या राज्यांमध्ये आदर्श अचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 ची घोषणा 20 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आली होती. तर, या निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडून 19 ऑक्टोबर 2019 या दिवशी मतमोजणी पार पडली होती. विद्यमान राज्य सरकारचा कार्यकाळही पुढच्या महिन्यात संपत आहे. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारखा आणि आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाल्याची आज करु शकतो. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील निवडणुका या झारखंड राज्याच्या आदी घेतल्या जाऊ शकतात, असेही समजते.
महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण 288 जागांसाठी निवडणूक होते. तर हरियाणा आणि झारखंड राज्यांमध्ये अनुक्रमे 90 आणि 82 जागांवर निवडणुका होतात. सन 2014 मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये थोड्याफार फरकाने विधानसभा निवडणुका समांतर कालावधीतच पार पडल्या होत्या. त्यामुळे या राज्यांतील राज्य सरकारांचा कार्यकाळही थोड्याफार फरकाने समांतर कालावधीतच पार पडतो आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांत सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका जाहीर होणे आवश्यक आहे.
एएनआय ट्विट
विधानसभा निवडणूक 2014 मध्ये झालेल्या मतमोजणीत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड अशा तिन्ही राज्यांत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांना सत्ता मिळाली होती. महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपला सरकार स्थापन करावे लागले. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर तर, झारखंडमद्ये रघुबर दास मुख्यमंत्री बनले होते. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: भाजपकडून 126-162 महायुतीचा फॉर्म्युला सेट? शिवसेना राजी! - सूत्र)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी आपापल्या परिने तयारी पूर्ण केली आहे. शिवसेना-भाजप आणि मित्रपक्ष महायुतीच्या माध्यमातून तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यातून विधानसभा निवडणुकीस सामोरे जात आहेत. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम हे स्वतंत्र लढणार आहेत. तर, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) हे महायुतीद्वारे लढणार आहेत. तर, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीबाबत बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नाही.