Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या गटनेतेपदावरून Eknath Shinde यांची हकालपट्टी वैध- विधानसभा उपाध्यक्ष

शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपत्ती केल्यानंतर बुधवारी त्यांनी विधानसभेच्या उपसभापतींना सेनेच्या 35 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते, ज्यात सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नमून केले होते.

Eknath Shinde (Pic Credit - ANI)

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. अशात शिवसेनेने (Shiv Sena) एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केल्याने या वादात ठिणगी पडली. आता महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी गुरुवारी सांगितले की, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची सभागृहातील गटनेतेपदी नियुक्ती करण्यास त्यांनी मान्यता दिली आहे.

शिवसेनेने मंगळवारी शिंदे यांना विधानसभेतील पक्षाचे गटनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता आज पत्रकारांशी बोलताना झिरवाळ म्हणाले, ‘शिवसेनेकडून अजय चौधरी यांची विधानसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करत असून शिंदे यांची तत्काळ प्रभावाने पदावरून हकालपट्टी करत असल्याचे पत्र मला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र मी स्वीकारले आहे.’ असे सांगून उपसभापती म्हणाले की, शिंदे यांची विधानसभेतील सेनेचे गटनेतेपदावरून करण्यात आलेली हकालपट्टी वैध आहे.

उल्लेखनीय म्हणजे, शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपत्ती केल्यानंतर बुधवारी त्यांनी विधानसभेच्या उपसभापतींना सेनेच्या 35 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते, ज्यात सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नमून केले होते. शिंदे यांच्या पत्राबाबत विचारले असता, झिरवाळ म्हणाले, ‘अशा पक्षीय घडामोडींमध्ये अपक्षांची कोणतीही भूमिका नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. गटनेत्याने  प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. मात्र एक (शिवसेना) आमदार नितीन देशमुख (जे बंडखोर नेत्यासोबत सुरतला गेले होते) यांनी दावा केला आहे की, शिंदे यांनी जारी केलेल्या पत्रावर त्यांनी स्वाक्षरी केलेली नाही, परंतु त्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी दिसत आहे. त्यामुळे मी त्याचा अभ्यास करेन, कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेईन आणि मग निर्णय घेईन.’ (हेही वाचा: शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती- Eknath Shinde)

देशमुख यांनी बुधवारी दावा केला की काही लोकांनी त्यांना जबरदस्तीने सुरत येथील रुग्णालयात दाखल केले होते, तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला नसतानाही त्यांना इंजेक्शन देण्यात आले होते. मंगळवारी देशमुख यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार अकोला पोलिसांत दिली होती.