Shiv Sena Action On Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्हे, पक्षाने विधिमंडळ गटनेता पदावरुन हटवताच ट्विटद्वारे प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेता पदावरुन हटविण्यात आले आहे. नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आलेली ही पहिली कारवाई आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शिवसेनेकडून पहिली कारवाई (Shiv Sena Action On Eknath Shinde) करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेता पदावरुन हटविण्यात आले आहे. नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आलेली ही पहिली कारवाई आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) असलेल्या महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. असे असताना काही कारणांमुळे नाराज असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या जवळपास 20 ते 25 आमदारांना सोबत घेऊन सूरतला पोहोचले आहेत. सध्या ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजय चौधरी शिवसेनेचे नवे विधिमंडळ गटनेते
दरम्यान, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन हटवल्यानंतर शिवडी येथील अजय चौधरी यांच्याकडे या पदाची धुरा सोपवली आहे. कट्टर शिवसैनिक असलेले अजय चौधरी हे आता शिवसेनेचे नवे विधिमंडळ गटनेते असतील.
विधिमंडळ गटनेता पदावरुन हटविल्यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. ट्विटरद्वारे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे ''आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही'.' (हेही वाचा, Existing Politics in Maharashtra: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे पडसाद, मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिष्टमंडळ सूरतला रवाना; NCP, काँग्रेसमध्ये बैठकांचा धडाका)
ट्विट
शिवसेना नेतृत्वाने केलेली कारवाई आणि त्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया पाहता राज्याच्या राजकारणात आणखी उलथापालत होण्याची शक्यता गडद बनली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या किती आमदार आहेत यांबाबत निश्चित माहिती नाही. तसेच, सोबत असलेल्या आमदारांपैकीही एकनाथ खडसे यांच्यासोबत किती आमदार आहेत याबाबतही अद्याप निश्चिती नाही. मात्र, एकनाथ खडसे यांनी केलेल्या ट्विटवरुन आता त्यांनी परतीचे दोर जवळपास कापले आहेत. त्यांचा निर्णय झाला आहे. हे स्पष्ट दिसते आहे. इतकेच की त्यांनी नेमका कोणता निर्णय घेतला आहे याबाबत कोणताही स्पष्टता अद्याप तरी आली नाही.
दरम्यान, पुढे गेलेल्या एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्यासाठी शिवसेना नेतृत्व प्रयत्नशिल असल्याची माहितीआहे. त्यासाठी एक शिष्टमंडळही सूरतकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या शिष्टाईला किती यश येते हे प्रत्यक्ष भेट एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट या शिष्टमंडळासोबत झाली तरच कळू शकणार आहे. तुर्तास तरी शिवसेना फूटीच्या उंबरठ्यावरच असल्याचे दिसते.