Eknath Shinde Rally: उद्धव ठाकरेंना मिळणार अजून एक झटका? शिवसेनेचे 2 खासदार आणि 5 आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज पुन्हा उद्धव ठाकरेंना झटका देण्याच्या तयारीत आहेत. आज (5 ऑक्टोबर, बुधवार) मुख्यमंत्री शिंदे यांचा दसरा मेळावा मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, तर ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. यामध्ये खासदार कृपाल तुमाने यांनी दावा केला आहे की, आज बीकेसीतील शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे 2 खासदार आणि 5 आमदार शिंदे गटात सामील होणार आहेत. याशिवाय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मुंबईतील काही माजी नगरसेवक आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होऊ शकतात.

एकनाथ शिंदे यांनी आजवर बंड करून शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आपल्या बाजूने करून घेतले व त्याद्वारे त्यांनी उद्धव ठाकरेंची खुर्चीही हिसकावून घेतली. यानंतर शिंदे सेनेने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या गोटात असताना, आता आज संध्याकाळी एकनाथ शिंदे ठाकरे गटाला आणखी एक धक्का देतात का, हा महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

उद्धव ठाकरे गटात शिवसेनेचे सध्या 6 खासदार आणि 15 आमदार शिल्लक आहेत. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच 12 खासदार आणि 40 आमदार घेतले आहेत. आता बीकेसीच्या दसरा मेळाव्यात कोणते 2 खासदार आणि 5 आमदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम), संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), राजन विचारे (ठाणे) यांचा समावेश आहे. याशिवाय दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन देऊळकर याही शिवसेनेत आहेत मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळू शकले नाही. (हेही वाचा: CM Eknath Shinde: दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सुचक ट्वीट

आमदारांबद्दल बोलायचे झाले तर ठाकरे गटात सध्या आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, अजय चौधरी, राजन साळवी चौधरी यांचा समावेश आहे.

कृपाल तुमाने यांच्या दाव्यानुसार आज जे दोन खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत त्यात एक मुंबईचा तर दुसरा मराठवाड्याचा आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मराठवाड्याबद्दल बोलायचे झाले तर ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव हे तिथून खासदार आहेत. ओमराजे निंबाळकर ठाकरे यांच्या जवळचे असल्याने ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता कमी आहे.) याशिवाय पाच आमदार कोण असू शकतात यावरही अटकळ बांधली जात आहे.