Eknath Shinde Govt Floor Test: अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्याह काँग्रेसच्या पाच आमदारांनी विश्वासदर्शक ठरावात नाही केले मतदान, जाणून घ्या कारण
विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर (Floor Test) मतदान सुरु असताना मतदानास पात्र असूनही काँग्रेस अशोक चव्हाण (Ashok Chavan), विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यासह पाच आमदारांना मतदान करता आले नाही.
'ऐन युद्धाच्या वेळी तोफेत पाणी' ही म्हण आपण ऐकली असेल. ही म्हण आठवावी अशी घटना राज्याच्या राज्याच्या विधिमंडळात घडली आहे. विधिमंडळाच्या विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर (Floor Test) मतदान सुरु असताना मतदानास पात्र असूनही काँग्रेस अशोक चव्हाण (Ashok Chavan), विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यासह पाच आमदारांना मतदान करता आले नाही. विश्वासदर्शक ठरावात मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे असतानाही या आमदारांना मतदान करता आले नाही. याबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जाणून घ्या नेमके काय घडले?
विधिमंडळात विधानसभा सभागृहात जेव्हा विश्वासदर्शक ठरावावर मतदान होते तेव्हा एक प्रक्रिया असते. विधानसभेचे अध्यक्ष मतदानापूर्वी बेल वाजवतात. बेल वाजवल्यानंतर सदस्यांनी विशिष्ट वेळेत सभागृहात पोहोचायचे असते. कारण ती वेळ संपली की सभागृहाचे दरवाजे बंद होतात. एकदा का दरवाजे बंद झाले की कोणालाही सभागृहात येता येत नाही आणि सभागृहात असलेल्या कोणालाही बाहेर जाता येत नाही. त्यामुळे सर्वांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक असते.
अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार लेटलतीफ
विधानसभा सभागृहात मतदानापूर्वी बेल वाजविण्यात आली. त्यानंतर सर्वसदस्यांनी सभागृहात वेळेत हजर राहणे अपेक्षीत होते. मात्र, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह पाच आमदार वेळेत पोहचू शकले नाही. त्यामुळे सभागृहाचे दरवाजे बंद झाले. परिणामी या आमदारांना मतदान करता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे देखील सभागृहात वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आले नाही.