Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल? भाजपला हा धक्का आहे का?
अशा स्थिती खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवश केला आहे. त्यामुळे हा संघर्ष थांबणार की अधिक वाढणार याबाबत उत्सुकता आहे.
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) आणि महाविकासआघाडीला किती फायदा होईल? तसेच भारतीय जनता पक्षाला (BJP) नेमका काय फटका बसू शकेल असेही विचारले जात आहे. खडसे यांच्या पक्षांतरामुळे होणाऱ्या फायद्यातोट्याचा विचार करता तो केवळ ठोकळेबाजपणे मांडता येणार नाही. त्यासाठी काही गोष्टी विचारात घ्यावा लागता. त्यानंतरच आपल्याला खडसे यांच्या पक्षांतराच्या परिणामांवर बोलता येईल.
जोर का झटका धिरे से
लोकसभा निवडणूक 2014 मध्ये मिळालेल्या यशानंतर भारतीय जनता पक्षाचा वारु चौखूर उधळला. त्यानंतर राज्य आणि देशातील विविध निवडणूका भाजप जिंकू लागला. परिणामी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर विविध मार्गांचा वापर करत भाजपमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात झाली. एक प्रकारे विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. गेली 8 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाजूक आवस्थेतून जात आहे. त्यातच विधानसभा निवडणूक 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपने शरद पवार यांनाच आव्हान दिले. त्यामुळे भाजपने केलेल्या राजकारणाचा पुरेपूर बदला राष्ट्रवादीने घ्यायचा ठरवले तर त्याच काहीच नवल नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे जोर का झकटा धिरे से दिया असेच म्हटले जात आहे.
भाजपचा डाव भाजपवर उलटला
एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा होईल भाजपला किती नुकसान होईल हा मुद्दा नंतरचा. पण, भाजप मेघाभरती करुन इतर पक्षातील नेते पक्षात आयात करणाऱ्या भाजपलाही जोरदार धक्का दिला जाऊ शकतो हा संदेश बाहेर गेला आहे. हा संदेश साधासुधा नाही. तर भाजपच्या संस्थापक सदस्य राहीलेला नेताही भाजप सोडू शकतो हा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. खडसे यांच्या रुपाने भाजपचा डावच राष्ट्रवादीने भाजपवर उलटवला आहे. (हेही वाचा, Cm Uddhav Thackeray On Eknath Khadse: यशाचे डोंगर चढताना पायाचे दगड का निसटत आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा भाजपला चिमटा)
राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा पण शिवसेना नाराज होण्याची शक्यता
उत्तर महाराष्टातून एकूण 11 आमदार येतात.त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापनेपासून साधारण 2009 पर्यंत 5 खासदार होते. परंतू, 2009 नंतर त्यात कमालीची घट होत गेली. आता उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार आहे. एकनाथ खडसे यांचा विचार करता जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये पर्यायाने खानदेश (उत्तर महाराष्ट्र) विभागात खडसे यांचे वजन चांगले आहे. त्यामुळे या भागात भाजपला धक्का लाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान,उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष गेल्या कित्येक वर्षांचा आहे. अशा स्थिती खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवश केला आहे. त्यामुळे हा संघर्ष थांबणार की अधिक वाढणार याबाबत उत्सुकता आहे. कारण प्रादेशीक पातळीवरील राजकारण वेगळे असते स्थानिक पातळीवरील राजकारण वेगळे असते. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना, आणि भाजप हे पक्ष प्रभावी राहिले आहेत. त्यामुळे इथे नेहमी भाजप-शिवसेना सामना रंगतो. त्यात शिवसैनिक आणि खडसे यांच्यात व्यक्तीगत संघर्ष असल्याप्रमाणे चित्र दिसते. त्यामुळे खडसे यांच्या नाराजीमुळे शिवसेना नाराज होणार का हे पाहावे लागणार आहे. अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीत खडसे यांचे स्वागत केले आहे.
दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून भाजप अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करतो. अशा वेळी भाजपच्या टीकेला भाजपमधूनच आलेल्या व्यक्तीकडून प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची तोफ तयार असेल हे नक्की.