Eknath Khadse Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैयक्तीक त्रास, राज्यातील राजकारणही गढूळ; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

त्यांच्या एन्ट्रीनंतर राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असा घणाखातही खडसे यांनी केला आहे.

Eknath Khadse Vs Devendra Fadnavis | (Photo credit: archived, edited, representative image)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेमध्ये आपल्या मागची जागा आपणच दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यातही माझी मोठी भूमिका होती. अनेक गोष्टीं त्यांना आपण शिकवल्या मात्र पुढे ते राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून भक्कमपणे आले तेव्हा त्यांनी आपल्याला व्यक्तीगत त्रास दिला. त्यांच्या एन्ट्रीनंतर राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असा घणाखातही खडसे यांनी केला आहे.

आमदार म्हणून मी पाठीमागील अनेक वर्षे काम करतो आहे. आता माझी ही सातवी टर्म आहे. पण इतक्या वर्षात कधी नव्हे तो राज्यातील राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला. त्याची सुरुवात 2014/15 पासून झाली. खास करुन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर. आजवर राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदेंसारखे अनेक दिग्गज मुख्यमंत्री होते. पण, त्यांच्यापैकी कोणीही कोणाला व्यक्तीगत त्रास देण्याचे काम केले नाही. कधीही सुडाचे राजकारण झाले नाही. पण, फडणवीस यांनी एखाद्या विरोध करणाऱ्या व्यक्तीला 'तुला बघून घेऊ' असे धोरण ठेवले. त्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा संस्थांचा वापर शस्त्र म्हणून केल्याचेही खडसे म्हणाले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीवर होत असलेल्या अवाढव्य खर्चाबाबतही एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. छ. संभाजीनगर हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. पण, त्यासोबतच या जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. अशी परिस्थीती असताना मंत्रिमंडळाच्या बैठका पंचतारांकीत हॉटेलमध्ये होत आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री तब्बल 3000 हजारांची थाळी खात आहेत. ही शेतकरी आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. मंत्र्यांचे हे वर्तन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचेही ते म्हणाले.