इजिप्तचा कांदा पुणे बाजारात दाखल; आकाराने मोठा असल्याकारणाने ग्राहकांनी फिरवली पाठ

लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, घाऊक बाजारात इजिप्तमधील कांद्याला फारशी मागणी नसल्याचे चित्र पुणे बाजारात पाहायला मिळत आहे.

कांदा (Photo Credit : ThoughtCo)

कांद्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना हे भाव नियंत्रणात आणण्यासाठी इजिप्तचा (Egypt) कांदा आयात करण्यात आला असून पुण्याच्या मार्केट यार्डात हा कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. मात्र हा कांदा आकाराने मोठा असला कारणाने ग्राहकांनी या कांद्याकडे सपशेल पाठ फिरवली आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, घाऊक बाजारात इजिप्तमधील कांद्याला फारशी मागणी नसल्याचे चित्र पुणे बाजारात पाहायला मिळत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालवणारे वगळता या कांद्याला पुणे बाजारात फारशी मागणी नाही.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात दोन दिवसांपूर्वी इजिप्तचा मुंबईमार्गे आलेला 50 टन कांदा दाखल झाला. इजिप्तचा कांदा आकाराने मोठा असला तरी आतून पोकळ आहे. त्यामुळे या कांद्याला भाव मिळाला नाही.

दिल्ली: कांदा रडवणार! दर प्रति किलो 70-80 रुपयांच्या घरात गेल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री

घाऊक बाजारात इजिप्तच्या कांद्याला दहा किलोमागे 250 ते 280 रुपये असा भाव मिळाला आहे. 2017 मध्ये घाऊक बाजारात इजिप्तच्या कांद्याची आवक झाली होती. त्या वेळी दहा किलो इजिप्त कांद्याला 340 रूपये असा भाव मिळाला होता. देशांतर्गत कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी यंदा इजिप्तचा कांदा बाजारात दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसांत कांद्याची अपेक्षेएवढी विक्री झालेली नाही तसेच या कांद्याला फारशी मागणीही नाही. या कांद्याचा आकार मोठा असून एका किलोमध्ये फक्त 4 ते 5 कांदे बसतात. ग्राहकांनी इजिप्तच्या कांद्याकडे पाठ फिरवली असल्याचे मार्केटयार्डातील कांदा व्यापा-यांचे म्हणणे आहे.

तीन वर्षांपूर्वी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात इजिप्तमधील कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. त्या वेळी इजिप्तमधील कांद्याला चांगला भाव मिळाला होता. मात्र यंदा इजिप्तमधील कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने तेथील कांदा उत्पादकांना नुकसान सोसावे लागणार आहे.