Dussehra Rally 2022: शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा वाद चिघळला; उद्धव ठाकरेंच्या याचिकेला विरोध करत CM Eknath Shinde यांच्या गटाने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव
शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, असे सेनेच्या अमेक आमदारांचे मत आहे. ठाकरे गटाचा दावा दिशाभूल करणारा आणि खोट्या तथ्यांवर आधारित आहे असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shivaji Park Dussehra Rally) घेण्यास परवानगी मागणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सेनेच्या उच्च न्यायालयातील याचिकेला विरोध करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळवा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबतचा वाद चर्चेत आला आहे.
दरवर्षी शिवसेना दादरच्या शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेते, मात्र यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंचा हा मेळावा होईल का नाही, याबाबत शंका आहे. अशात या मेळाव्याच्या परवानगीबाबत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर या याचिकेला विरोध करत शिंदे गटही न्यायालयात पोहोचला आहे.
‘खरी शिवसेना कोणाची’, हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, असे सेनेच्या अमेक आमदारांचे मत आहे. ठाकरे गटाचा दावा दिशाभूल करणारा आणि खोट्या तथ्यांवर आधारित आहे असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाबाबत जोपर्यंत निवडणूक आयोग निर्णय देत नाही तोपर्यंत याचिकेवर सुनावणी करू नये, अशी विनंती शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या याचिकेवर उद्या, 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. (हेही वाचा: Dussehra Melava 2022: शिवाजी पार्क यंदा शांत; दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांना परवानगी नाही, मुंबई महापालिकेचा निर्णय)
ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊ देऊ नये, अशी विनंती करणारी याचिका शिंदे गटाने गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल केली. आज सकाळी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाने याचिकेत काही दुरुस्त्या करण्यासाठी वेळ मागितला होता, त्यावर हायकोर्टाने दुपारी अडीच वाजता सुनावणी निश्चित केली होती, मात्र उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांच्या विनंतीनंतर सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात झाली. दुसरीकडे, दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी सेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोघांनाही बीएमसीने सकाळीच परवानगी नाकारली.