अनधिकृत झोपडपट्टी, रुळालगतच्या अतिक्रमणांमुळेच रेल्वेवर दगडफेकीच्या घटना; पुणे विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांचा आरोप

तिरुवेल्ली-दादर एक्सप्रेस ( Thirunvelli-Dadar Express) या गाडीवरही नुकतीच अज्ञातांनी दगडफेक केली.

(Archived and representative images)

Stone pelting on trains in Pune: गेल्या काही काळात पुणे येथील चिंचवड-आकुर्डी, घोरपडी-सासवड, दापोडी परिसरातील मार्गावरुन जाणाऱ्या रेल्वेच्या काही गाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, दगडफेकीच्या या घटनांना रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्या आणि रुळ परिसरातील अतिक्रमणेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. लांब पल्ल्याच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या वळी या गाडीच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला होता.

दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये दगडफेकीच्या घटना वाढत आहेत. तिरुवेल्ली-दादर एक्सप्रेस ( Thirunvelli-Dadar Express) या गाडीवरही नुकतीच अज्ञातांनी दगडफेक केली. या हल्ल्यात गाडीचे इंजिन आणि काही डब्यांचे नुकसान झाले. सासवड ते घोरपडी दरम्यानच्या मार्गाववरुन गाडी मार्गक्रमण करत असतना ही घटना घडली. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नव्हता. मात्र, प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान (RPF) तैनात केले आहेत. मात्र, अशा प्रकारच्या घटना रेल्वे हद्दीतील जागांवर झालेल्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमणांमुळेच होत असल्याचा आरोप पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. (हेही वाचा, रेल्वे प्रवासात 'अॅप'च्या माध्यमातूनही करता येणार 'FIR')

दरम्यान, दगडफेकीच्या या घटनांप्रकरणी चिंचवड-आकुर्डी येथे अज्ञातांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार दगडफेकीच्या घटना प्रामुख्याने दापोडी, आकुर्डी, चिंचवड आणि घोरपडी या परिसरात घडत आहेत. अशा घटना प्रामुख्याने रात्रीच्या वेळी घडत असल्याचेही निरीक्षण आरपीएफने नोंदवले आहे.