मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये दुध, भाज्यांचा तुटवडा; दर आकाशाला भिडले

रस्तेमार्ग बंद झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम मुंबईमधील जनजीवनावर होत आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची मागणीपेक्षा आवक कमी होत असून, किरकोळ मार्केटमध्ये भाज्यांचे बाजारभाव प्रचंड वाढले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

गेला एक आठवडा पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान खात्याने पुढचे दोन दिवस अजून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्याची परिस्थिती पाहता सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक अशा महत्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. रस्तेमार्ग बंद झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम मुंबईमधील जनजीवनावर होत आहे. मुंबईमध्ये भाजीपाल्याची मागणीपेक्षा आवक कमी होत असून, किरकोळ मार्केटमध्ये भाज्यांचे बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. कोल्हापूरमधील पुरामुळे गोकुळचे किमान दहा लाख लिटर दुध शिल्लक असल्याची माहिती आहे.

मुंबईमध्ये साधारण रोज 400 ट्रक भाजीपाला येत असतो. मात्र पावसामुळे त्यात घट होऊन सध्या साधारण 150 ट्रकच शहरात पोहचू शकत आहेत. यामुळे भाजीपाल्यांचे दर आकाशाला भिडले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर तशीही बाजारात भाजीपाल्याची आवक घटली होती, मात्र आता कोथिंबीर मिळणेही दुरापास्त झाले आहे. याचा फटका ग्राहकांसोबत व्यापारी लोकांनाही बसला आहे. व्यापारी चढ्या दराने भाजी विकत घेत आहेत, मात्र पुढे ग्राहक महागाईमुळे या भाज्या विकत घेण्यास उत्सुक नाहीत. (हेही वाचा: Maharashtra Monsoon Update 2019: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज)

दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, पुणे आणि नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला होणारा दूधपुरवठा निम्म्याने घटला आहे. जोपर्यंत रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरु होत नाही तोपर्यंत मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसराला असाच दुधाचा तुटवडा जाणवणार आहे.