महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल अवघ्या काही तासांवर; 'असा' असेल सुरक्षा बंदोबस्त

उद्या मतमोजणी केंद्रावर अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून दंगा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठीच पोलिसांची (Maharashtra Police) विशेष तुकडी सज्ज करण्यात आली आहे,

Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Maharashtra Assembly Elections 2019 Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल आता अवघ्या काहीच क्षणांवर येऊन ठेपला आहे. राजकीय वर्तुळापासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांचेच डोळे या निकालाकडे लागून आहेत, यंदा मातब्बर मंडळींमध्ये रंगलेली लढत पाहता ही निकालाची उत्सुकता अगदीच साहजिक आहे. हीच बाब लक्षात घेता उद्या मतमोजणी केंद्रावर अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून दंगा होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठीच पोलिसांची (Maharashtra Police) विशेष तुकडी सज्ज करण्यात आली आहे, या मतमोजणी आणि निकाल कार्यात तब्बल 25 हजार सरकारी कर्मचारी सहभाग घेतील.

यासोबतच सुरक्षेच्या अनुषंगाने आणखीनही अनेक बंदोबस्त करण्यात आले आहेत, या तयारीचा एक आढावा पाहुयात..

प्राप्त माहितीनुसार, उद्या सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील 269 ठिकाणी 288 केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. या केंद्रांवर प्रत्येक उमेदवारांच्या काही प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार आहे. तर या सर्व कार्यावर देखरेखीसाठी काही केंद्रांवर केंद्रीय निवडणूक आयोग अधिकारी देखील उपस्थित असतील. यापैकी काही उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यास यासंदर्भात निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांकडे राखीव असणार आहे.

Maharashtra Assembly Elections 2019 ABP Majha C Voter Exit Poll Results: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणार? पहा जागांची आकडेवारी

अनेकदा मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक नशा करून हुल्लडबाजी करण्याचे प्रसंग उद्भवतात, याची खबरदारी म्हणून उद्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सहित राज्यभरात मद्यविक्री बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मतमोजणी केंद्राबाहेर व स्ट्राँग रुममध्येही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

दरम्यान, उद्या राज्यातील 288 मतदारसंघाच्या जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल समोर येतील. यातूनच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण होणार या बहुचर्चित प्रश्नाचे सुद्धा उत्तर समोर येणार आहे. यंदा प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी अतोनात मेहनत घेतली होती,परिणामी मतांची टक्कर सुद्धा कमी अधिक फरकाने झाली असू शकते. तर दुसरीकडे निवडणूक निकालपूर्व जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोल नुसार पुन्हा एकदा भाजपा शिवसेनेची सत्ता येण्याचे चिन्ह आहे. हे अंदाज योग्य ठरतात का हे पाहण्यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.