अभिमानास्पद! डॉ. प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव; उद्या दिल्लीत पार पडणार सोहळा

प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना गौरवण्यात येणार आहे.

प्रकाश आमटे (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक, बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स (Bill Gates) यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना गौरवण्यात येणार आहे. उद्या, म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम राजधानी दिल्ली येथे पार पडेल. या कार्यक्रमामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे.

17 नोव्हेंबरमध्ये रोजी, संध्याकाळी नवी दिल्ली येथील आयसीएमआर हॉल या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमामध्ये डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा गौरव बिल गेट्स करणार आहेत. गेट्सकडून या मान्यवरांना मेडल प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाची माहिती स्वतः प्रकाश आमटे यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना दिली आहे. याआधी प्रकाश आमटे यांना त्यांच्या उत्तुंग कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार, मॅगसेसे पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार. श्रीमंत मालोजीराजे स्मृति पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, प्रकाश आमटे आपल्या पत्नीसह गेली चार दशके आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजिविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये काम करत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये अनाथ जंगली प्राण्यांसाठी अनाथालय चालवतात. 1973 साली सुरू झालेल्या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली.