राज्य सरकारचा मोठा निणर्य; आता N-95 मास्क खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक; सर्व मेडिकल स्टोअर्सना दिले आदेश
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सर्व वैद्यकीय स्टोअर्सना डॉक्टरांच्या सूचनाशिवाय एन-95 मास्क विकू नये असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात आता एन-95 मास्क (N-95 Mask) खरेदी करण्यासाठी वैद्यकीय सल्ला बंधनकारक करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सर्व वैद्यकीय स्टोअर्सना डॉक्टरांच्या सूचनाशिवाय एन-95 मास्क विकू नये असे आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूपासून (Corona Virus) बचाव करण्यासाठी लोक जास्त प्रमाणात मास्क खरेदी करत आहेत. यामुळे केवळ मास्कची कमतरताच उद्भवत नाही, तर त्याचा अतिरेक आणि काळाबाजारही वाढत आहे. परिणामी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आता एन-95 मास्क खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची चिट्ठी असणे आवश्यक असणार आहे.
दिल्लीत कोरोना विषाणूची पुष्टी झालेल्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, देशभरातील लोक घाबरले आहेत. बचावाच्या पार्श्वभूमीवर लोकांची मेडिकल स्टोअर्सवर मास्क खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. महाराष्ट्र एफडीए विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार, डॉक्टरांचा सल्ला न घेता एन-95 मास्क आणि वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) किट विक्री करण्यास राज्यात बंदी घातली आहे. याबाबत एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या संधीचा फायदा घेत बरेच लोक केवळ मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा खरेदीच करत नाहीत तर ते जमाही करतात. त्यामुळे इतर लोकांना मास्क मिळवण्यात अडचणी येत आहेत.
बीएमसी आणि राज्य शासकीय रुग्णालयात औषध पुरवतात त्यांनी सांगितले की, हा निर्णय हादबाडीने घेतलेला निर्णय आहे, यामुळे लोकांच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतील. ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे म्हणाले की, या निर्णयामुळे नॉन मेडिकल वस्तूंसाठी लोकांना आधी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लिहावे लागेल आणि नंतर मास्क घ्यावा लागेल. मात्र यामुळे मास्क लिहून देण्यासाठी डॉक्टर पैसे तर घेतीलच मात्र अनेक लोक मास्क घेण्यापासून वंचित राहू शकतात. (हेही वाचा: Mumbai: सध्या रुग्णालयात COVID-19 चा कोणतीही संशयास्पद किंवा सिद्ध रुग्ण नाही; पी. डी. हिंदुजा रुग्णालय आणि एमआरसीने दिली माहिती)
दरम्यान, मुंबई महानगपालीका व महाराष्ट्र शासनाने याबाबत 24X7 हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. बीएमसीने मुंबई शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवण्यासाठी 1916 हा नंबर सुरु केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने खास कोरोना व्हायरससाठी हेल्पलाईन क्रमांक '020-26127394' सुरू केला आहे. ठाणे महानगरपालिकाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आठ बेडचे आयसोलेशन वॉर्ड स्थापन केले आहे.