Mumbai: धक्कादायक! मुंबईच्या नायर रुग्णालयात एका 26 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या; कारण अस्पष्ट
सोमवारी (15 फेब्रुवारी) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मुंबईच्या (Mumbai) नायर रुग्णालयात (Nair Hospital) कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांनी आत्महत्या (Doctor Commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (15 फेब्रुवारी) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. डॉक्टराच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.अवघ्या 26 व्या वर्षात संबंधित डॉक्टराने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? असाही प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे. तुपे यांच्या वडिलांना तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तुपे हे वडिलाना भेटण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होते. तुपे हे औरंगाबादहून रविवारी पुन्हा मुंबईत परतले होते. सोमवारी त्यांनी दिवसभर काम केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी संध्याकाळी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन इंजेक्शन घेत आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अग्निपाडा पोलीस ठाण्यात याप्रकणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Mumbai Murder: चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
एएनआयचे ट्वीट-
याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. डॉ. तुपे यांनी एवढे कठोर पाऊल उचलण्यामागचे कारण काय असेल? याचा शोध पोलीस घेत आहेत. 2019 साली डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी हेच नायर रुग्णालय रॅगिंगमुळे चर्चेत आले होते.