गणेशोत्सव २०१८: डीजे, डॉल्बी बंद, मिरवणूक सुरु
डीजे आवाज नको वाढवू तुला कोर्टाची शपथ हाय..! सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असा सज्जड दमही कोर्टाने भरला आहे.
गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीचा दणदणाट उडवून देणाऱ्या गणपती मंडळांना मुंबई हायकोर्टाने चांगलाच चाप लावला आहे. ध्वनि प्रदूषण, आणि उत्सव काळात होणाऱ्या गोंगाटाचे कारण देत हायकोर्टाने यंदा मिरवणुकीदरम्यान लावल्या जाणाऱ्या डीजे, डॉल्बी सिस्टमवरच बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर, सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असा सज्जड दमही कोर्टाने भरला आहे.
'आवाज वाढव डीजे तुला, आयची शपथ हाय..!', 'पप्पी दे पप्पी दे पारुला', 'डॉल्बीवाल्या बोलंव माझ्या डीजेला....', यांसारख्या गाण्यांचा डीजे, डॉल्बीवरचा ठेका काही औरच. हा ठेका ऐकताच अनेकांच्या शरीराला असा काही कंप सुटतो की, तो कंप नाचल्याशिवाय थांबत नाही. पण, मिरवणूक काळात मुठभरांच्या आनंदासाठी इतरांना त्रास होतो याचे भानच या मंडळींना नसते. त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि गोंगाटाची गंभीर दखल घेत गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमचा वापराला मुंबई हायकोर्टाचा तूर्त नकार दिला आहे.
दरम्यान, साऊंड सिस्टमच्या वापरावर सरसकट बंदी घालने कितपत इष्ट आहे? असा सवाल विचारत हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी काही तांत्रिक कारणास्थ १९ सप्टेंबर पर्यंत स्थगित करण्यात आली आहे.