Diwali Bonus for BMC Employees: बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीनिमित्त मिळणार तब्बल 26 हजार रुपये बोनस; CM Eknath Shinde यांची घोषणा

यावर्षी त्यात वाढ करून 26 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

CM Eknath Shinde (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना (BMC Employees) यावर्षी दिवाळीनिमित्त (Diwali 2023) 26 हजार रुपये सानुग्रह अनुदान (Diwali Bonus) देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. आज वर्षा निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना प्रथमच 2500 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून 26 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या बहुउद्देशीय कामगारांना देखील सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. त्यावर रुग्णालय बहुउद्देशीय कामगार आणि बालवाडी शिक्षिकांना दिवाळी भेट देण्यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले.

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली गट विमा योजना 2017 पासून बंद होती. ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देतानाच त्यात वाढ करून पाच लाखांपर्यंतची गट विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आणि ही योजना जानेवारी 2024 पासून लागू करण्याबाबत प्रशासनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. आशा सेविका यांना एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा: Maharashtra Cabinet Meeting Decisions: धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 282 पदांची भरती, एअर इंडिया इमारत खरेदी; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले अनेक महत्वाचे निर्णय)

महानगरपालिकेच्या कामगार वसाहतींमध्ये नियमित स्वच्छता करतानाच तेथील शौचालये, स्वच्छतागृहांची दुरुस्ती देखील करण्यात यावी,  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी शिष्यवृती देण्याची देखील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.