Diwali 2022: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली येथे आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांच्या सोबत साजरी केली दिवाळी; एकत्र फराळही घेतला (See Photos)

यापूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नक्षलवादासोबत सामना करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भामरागड परिसरातील धोडराज पोलीस चेक पोस्ट येथे, पोलीस दलासोबत दिवाळी साजरी केली. 'दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे. त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज भामरागड येथे जात असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.'

'गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जनजागरण मेळाव्यास संबोधित केले तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. ते पुढे म्हणाले, गत दोन वर्षात कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस महत्त्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच, आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम देण्याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात अमुलाग्र बदल झालेला दिसत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा: BJP-MNS Alliance: भाजप-मनसे युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही; Chandrakant Patil यांनी केले स्पष्ट)

यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करण्याचा घेतलेला निर्णय हा पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाचा आहे. सरकारच्या पाठिंबामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत आहेत. आज 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक दिवसीय गडचिरोली दौऱ्यासाठी नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर विमानतळावर स्वागत स्वीकारून त्यांनी गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आले. यापूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला होता. तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी घेतली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif