Diwali 2020: दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट (Watch Video)
या शुभदिनी पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्यात फुलांनी स्वतिक, ओम साकारले आहेत.
आज (16 नोव्हेंबर) कार्तिक प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा. या शुभदिनी पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Pandharpur Vitthal Rukmini Mandir) रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्यात फुलांनी स्वतिक, ओम साकारले आहेत. विठ्ठल आज निळ्या रंगाचे धोतर, केशरी रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाचा उपरणं नेसवण्यात आले आहे. तर रुक्मिणी मातेला पिवळ्या रंगाची साडी नेसवण्यात आली आहे. यामुळे विठ्ठल रुक्णिणीचे रुप साजिरे गोजिरे रुप अधिकच खुलून आले आहे. तर फुलांची सजावट मनमोहक वाटत आहेत. त्यामुळे एकंदर वातावरणात प्रसन्नता जाणवत आहे. (महाराष्ट्रातील धार्मिळ स्थळे आजपासून भाविकांसाठी खुली, सिद्धीविनायक मंदिर, शिर्डी, तुळजाभवानी मंदिरामध्ये 'हे' असतील महत्त्वाचे नियम)
महत्त्वाच्या सणांना पंढरपूरचे विठ्ठ्ल मंदिर वैविध्यपूर्ण पद्धतीने सजवले जाते. आज दिवाळी पाडवा, भाऊबीज या निमित्ताने देखील ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कोविड-19 संकटात मंदिरं बंद असतानाही गणेशोत्सव, नवरात्र या काळात सजावटीची परंपरा मंदिर समितीकडून अखंड ठेवण्यात आली होती.
पहा व्हिडिओ:
दरम्यान, आजच्या शुभ मुहुर्तावर गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरं खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आनंद पसरला असून दर्शनासाठी त्यांनी मंदिरात धाव घेतली आहे. मंदिरं खुली करण्यात आली असली तरी कोविड-19 चा धोका काही टळलेला नाही. त्यामुळे विशेष नियमांचे पालन करुन भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात दररोज मंदिरात केवळ 1000 भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे.