Dilip Walse Patil: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे अवाहन

त्यामुळे पुतळे उभारण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या. त्यानंतरच पुतळे उभारा असे अवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आहे.

Dilip Walse-Patil | (Photo Credit : Facebook)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची सुरक्षीतताही महत्त्वाची असते. त्यामुळे पुतळे उभारण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या. त्यानंतरच पुतळे उभारा असे अवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राजापेठ उड्डाणपूलावरट शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर इशारा देताना गृहमंत्री बोलत होते. अमरावती (Amravati) शहरात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चर्चेचा विषय बनला आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शिवाजी महाराजांवरील प्रेम मी समजू शकतो. मात्र हे प्रेम व्यक्त करत असताना नियमांचे पालन होणेही महत्त्वाचे आहे. पुतळा बसवताना किंवा शिवजयंती साजरी करताना कोणीही नियमांचे उल्लंघन करु नये. कोरोना व्हायरस महामारीदरम्यान, केंद्र सरकारनेकाीह बंधने घातली आहेत. त्यामुळे केवळ हिंदुनाच लक्ष्य केले जाते आहे, असे म्हणे चुकीचे आहे. काही लोकांकडून समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही वळसे पाटील यांनी केला. (हेही वाचा, Police Recruitment: महाराष्ट्रात लवकरच 7200 पदांची पोलीस भरती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती)

मराठा आरक्षणाबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबीत आहे. त्यामुळे न्यायालयात या निर्णयाचा निकाल लागेपर्यंत सर्वांनी वाट पाहणे महत्त्वाचे. कायदा व सुव्यवस्था पाळणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. काही लोक मंत्र्यांच्या घरासमोर आणि पक्ष कार्यालयांवर आंदोलने करत आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेची घोषणा केली आहे. त्यांना नेमकं काय म्हणायचे आहे हे थेट पत्रकार परिषदेतच स्पष्ट होईल. त्यामुळे त्यानंतरच त्यावर बोलणे योग्य होईल, असे वळसे पाटील म्हणाले.