Dhule: नंग्या तलवारींसह चौघांना अटक, इतका मोठा शस्त्रसाठा कशासाठी? धुळे पोलीस चक्रावले

सोनगीर पोलीस (Songir Police Station) स्टेशनपासून अवघ्या 500 मिटर अंतरावर पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमध्ये या तलवारी आणि एक खंजीर आढळून आला.

Dhule Weapons | (Photo Credit - YouTube)

मुंबई आग्रा महामार्गावरुन (Mumbai Agra Highway) जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर धुळे (Dhule Police) पोलिसांनी तब्बल 90 नंग्या तलवारी जप्त केल्या आहेत. सोनगीर पोलीस (Songir Police Station) स्टेशनपासून अवघ्या 500 मिटर अंतरावर पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमध्ये या तलवारी आणि एक खंजीर आढळून आला. इतक्या मोठ्या प्रमाणावर तलारी पाहून पोलिसही चक्रावून गेले. हा शस्त्रसाठा आरोपींना कुठे घेऊन जायचा होता याबाबत आता तपास सुरु झाला आहे. धुळे पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम आणि कपिल दाभाडे अशी त्यांची नावे आहेत. चौघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

धुळे पोलिसांना पेट्रोलिंग करताना एक स्कार्पिओ अत्यंत वेगाने जाताना आढळली. संशय आल्याने तातडीने ही स्कार्पिओ थांबविण्यासाठी पोलिसांनी तातडीने हात केला. पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चालकाने गाडी अधिकच वेगात पळवली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. शेवटी पोलिसांनी पाटलाग करुन स्कार्पिओ पकडली. पोलिसांनीचालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. स्कार्पिओ तपासली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. गाडीत नंग्या तलवारी आढळून आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर तलवारी पाहताच पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या आणि चार आरोपींना ताब्यात घेतले. (हेही वाचा, Gujarat: अरबी समुद्रात पाकिस्तानी बोट पकडण्यासाठी गोळीबार, 280 कोटींचे हेरॉईन जप्त, नऊ जणांना अटक)

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक, शेख इलियास शेख लतीफ, सय्यद नईम सय्यद रहीम आणि कपिल दाभाडे या चौघाचा समावेश आहे. हे चौघेही जालना शहरातील चंदनजीरा परिसरातील रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या सर्व तलवारी चित्तोडगड येथून आणल्या असाव्यात असा पोलिसांना संशय आहे. मात्र, एकाच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा घेऊन हे चौघे काय करणार होते या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकले नाही.