धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण: 'त्या' तिघांवर FIR दाखल करा, चौकशी समितीची शिफारस
धर्मा पाटील | (Photo Courtesy: Archived, Edited, Representative Image)

Dharma Patil Suicide Case: धर्मा पाटील आत्महत्या (Dharma Patil Suicide) प्रकरणी 'त्या' तीन जणांवर एफआयआर (FIR) दाखल करा, अशी शिफारस चौकशी समितीने (Dharma Patil Suicide Case Inquiry Committee) केली आहे. चौकशी समितीने ज्या तिघांवर एफआयआर दाखल करण्याची शिफारस केली आहे त्यात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे (Land Acquisition Officer Pratibha Sapkale) , तहसील अधिकारी रोहिदास खैरनार (Tehsildar Rohidas Khairnar) आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले (Dattatreya Desale) यांची नावे आहेत. चौकशी समितीने या तिघांवर कामात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला आहे.

धर्मा पाटील हे मूळचे धुळे जिल्ह्यातील विखरण (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी होती. सरकारी प्रकल्पासाठी त्यांच्या जमीनीचे भूसंपादन केले होते. फळबागा असलेल्या शेतीचे भूसंपादन झाल्यामुळे त्याचा योग्य तो मोबदला मिळावा अशी पाटील यांची मागणी होती. या मागणीसाठीच धर्मा पाटील हे सरकारदरबारी खेटे घालत होते. दरम्यान, अनेक वेळा खेटे घालूनही पदरी निराशाच पडल्याने धर्मा पाटील यांनी 22 जानेवारी 2018 रोजी राज्याच्या मंत्रालयात प्रवेश केला आणि विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्य सरकारवर चौफेर टीका झाली. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती

दरम्यान, धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने माजी जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला. या अहवालातच स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसील अधिकारी रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्या विरोधात FIR दाखल करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. (हेही वाचा, धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला इशारा; ...अन्यथा आत्महत्या करेन)

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस हे 22 ऑगस्ट रोजी दोंडाईचा दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमिवर पोलिसांनी धर्मा पाटील यांची 72 वर्षीय पत्नी सखूबाई यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विशेष म्हणजे सखूबाई यांनी काही हालचाल करु नये यासाठी त्यांना राहत्या घरीच स्थानबंद्ध करुन नजरकैद केले होते. त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यालाही नजरकैदेच ठेवल्याचे समजते.