Maharashtra Floods: पूरग्रस्त भागातील दौऱ्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असून अनेक नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत.

Devendra Fadnavis , Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असून अनेक नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत. दरम्यान, पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका मांडली. राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने प्रसंगावधान राखले पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही, त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, फडणवीस म्हणाले की पवार साहेबांनी केलेले आवाहन आपण समजून घेतले पाहिजे. दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण पडता कामा नये. मी विरोधी पक्षनेता आहे. ज्यावेळी आम्ही जातो, तिथे शासकीय यंत्रणा फारशी नसते. आमचे दौरे गरजेचे आहेत. आमच्यामुळे शासकीय यंत्रणा जागी होते आणि कामाला लागते. महत्वाचे म्हणजे, लोकांमधील आक्रोश आम्हाला समजून घेता येतो आणि ते सरकारपुढे मांडता येतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच शरद पवार यांनी केलेले आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदरकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यांचे म्हणणे योग्यच आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून येत्या 3 दिवसांत पूरग्रस्त भागाचा दौरा करणारच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Uddhav Thackeray Birthday Special: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल B S Koshyari यांच्याकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

शरद पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी पूरग्रस्त भागात दौरे केले. त्यांचे दौरे पूरग्रस्त लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची काहीच हरकत नाही. ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिले पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचे मी स्वागत करतो. कारण, ही त्यांची जबाबदारी आहे. पण, माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होते. यामुळे माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणे टाळायला हवे, असे मला वाटते.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना 10 हजार रुपये रोख रक्कम आणि पाच हजाराचे धान्य मदत रुपात देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिली आहे.