मुख्यमंत्र्यांनी सामना ला दिलेल्या मुलाखतीत केवळ धमक्या दिसल्या वर्षपूर्तीचा आढावा नाही- देवेंद्र फडणवीस

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सामनाला वर्षपूर्ती निमित्त दिलेल्या मुलाखतीत केवळ धमक्या दिसल्या वर्षपूर्तीचा आढावा नाही अशी टोलाही त्यांना मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Devendra Fadnavis (Photo Credits: Twitter)

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने भाजप पक्ष सरकारला धारेवर धरण्यासाठी आजपासून 3 दिवस राज्यभरात पत्रकार परिषद घेणार आहेत. यात नुकतीच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर आगपाखड केली आहे. या सरकारने गेल्या वर्षभरात केवळ आमच्या कामांना स्थगिती देणे हे एकच काम केले आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सामनाला वर्षपूर्ती निमित्त दिलेल्या मुलाखतीत केवळ धमक्या दिसल्या वर्षपूर्तीचा आढावा नाही अशी टोलाही त्यांना मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला.हेदेखील वाचा-Kirit Somaiya on Thackeray Government: 'ठाकरे सरकार उत्तर द्या' म्हणत वर्षपूर्ती निमित्त किरीट सोमय्या यांनी विचारले 10 प्रश्न

"या सरकारने वर्षभरात काही विशेष काम केले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं" अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असं फडणवीस म्हणाले.

कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पत्रकार अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या प्रकरणाचे निकाल लागण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आली हे बरं झालं. नाही तर ही मुलाखत म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरला असता. आम्ही अर्णव आणि कंगनाच्या प्रत्येक मताशी सहमत नाही. मात्र विरोधी विचारांना चिरडूनच टाकायचं याच्याशी तर आम्ही अजिबातच सहमत नाही”, असं फडणवीस म्हणाले.