दिल्ली: शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; राजकीय नव्हे तर शेतकर्‍यांसाठी 'या' मागण्यांकरिता झाली 45 मिनिटांची बैठक

त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी याकरिता शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे एक निवेदनही आज सादर केलं आहे.

Narendra Modi and Sharad Pawar | Photo Credits: Twitter/ ANI

दिल्लीमध्ये आज एनसीपी नेते शरद पवार (Sharad Pawar)  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्यामध्ये 45 मिनिटं बैठक झाली. राज्यात अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ यांच्यामुळे झालेलं नुकसान शेतकर्‍यांसाठी भयंकर आहे. त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी याकरिता शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे एक निवेदनही आज सादर केलं आहे. दरम्यान हेक्टरी किमान 30 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान 2012-13 प्रमाणे 30 हजार रूपयांची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. शेतकर्‍यांंच्या प्रश्नासोबतच सत्तापेचावरही चर्चा झाली का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

मीडिया रिपोर्टनुसार शरद पवार यांच्याशी बोलताना नरेंद्र मोदींनी निर्मला सीतारमन यांनाही बोलावले तसेच त्यानंतर अमित शहांसोबतची चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवारांना भाजपा ने दिली राष्ट्रपती पदाची ऑफर? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण लागण्याची शक्यता- सूत्र.

शरद पवार यांचे Tweet  

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू केल्याने केंद्र सरकारने तातडीची पावलं उचलत शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांनी दोन जिल्ह्यामध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देताना राज्यपालांनी देऊ केलीली मदत पुरेशी नसल्याचं म्हटलं आहे. मराठवाडा, विदर्भात ओल्या दुष्काळामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याची माहितीदेखील शरद पवार लवकरच केंद्र सरकारला पाठवणार आहेत.

महाराष्ट्रात चक्रीवादळ आणि लांबलेला मान्सून यामुळे मोठं नुकसान झालं आहे. मध्य महाराष्ट्रासोबत कोकण किनारपट्टीवरही मच्छिमार्‍यांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. या भेटी दरम्यान राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.