Deccan Queen Canceled: प्रवासी संख्या घटल्याने आता डेक्कन क्वीन देखील स्थगित

ही गाडी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत मध्य रेल्वेने स्थगित केली आहे. आता पुढील सूचना मिळेपर्यंत 14 मे पासून डेक्कन क्वीन देखील बंद राहणार आहे.

Train | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोरोना संकटामध्ये सध्या मुंबई, महाराष्ट्रसह देशभर कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत असताना आता संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली अंमलात आणली जात आहे. एन उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये देखील अनेकांना घरीच रहावं लागत आहे. त्यामुळे रोडावलेल्या प्रवाशी संख्येमुळे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द झाल्या आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी काही गाड्यांची यादी प्रसिद्ध केलीहोती त्यामध्ये आता पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, 14 मे पासून डेक्कन क्विन (Deccan Queen) देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई- पुणे प्रवास करणार्‍या अनेकांना या मार्गांवरून जाणार्‍या लांब पल्ल्यांच्या इतर गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात जसा कोरोना फैलावत गेला तशी प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र त्यानंतर हळूहळू कोविड स्पेशल ट्रेन्स चालवण्यात आल्या. पण पुन्हा 2021 च्या सुरूवातीपासून मुंबई- पुण्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आणि प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ वळवली.

सध्या कॉलेज इतर शिक्षण संस्था बंद आहेत. खाजगी कार्यालयंदेखील बंद असल्याने आता कामासाठी मुंबई- पुणे प्रवास करणार्‍यांचं प्रमाण कमी झालं आहे. डेक्कन क्वीन पूर्वी मागील आठवड्यात पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस देखील रद्द झाली आहे. ही गाडी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत मध्य रेल्वेने स्थगित केली आहे. आता पुढील सूचना मिळेपर्यंत 14 मे पासून डेक्कन क्वीन देखील बंद राहणार आहे.

डेक्कन क्वीन प्रमाणेच कोल्हापूर-मुंबई देखील 18 मे पासून रद्द केली जाणार आहे. सोबतच पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर-नागपूर, दादर-पंढरपूर, दादर-शिर्डी, मुंबई-गदग, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-बिदर, मुंबई-लातूर, पुण्याहून प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सोडण्यात येणारी पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेस, पुणे-फलटण, लोणंद-फलटण या मार्गावरील डेमू देखील स्थगित असेल.