Dangerous Bridges in Mumbai: गणेशोत्सवामध्ये मूर्तींचे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन; BMC ने जारी केली मुंबईतील धोकादायक पुलांची यादी (See List)

काही धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Lord Ganesh (PC - Twitter)

महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2023) धामधूम सुरु झाली आहे. मुंबई-पुण्यासारख्या तर फार मोठ्या प्रमाणात हा सण साजरा होतो. या उत्सवादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बीएमसीने (BMC) प्रयत्न सुरु केले आहेत. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी त्यांच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाच्या मार्गाचा आढावा घेण्याचे आणि रस्त्यांवर खड्डे पडलेले आढळल्यास खड्डे भरण्याचे निर्देश दिले आहेत.

चहल यांनी नागरिक, भाविक आणि गणेश मंडळांनी रेल्वे ओव्हर ब्रिजवर काळजीपूर्वक मिरवणूक काढण्याचे आणि बीएमसी तसेच मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

यंदा 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी बीएमसी रस्त्यांची दुरुस्ती, गणेश मंडळ परिसर स्वच्छ ठेवणे, विसर्जनस्थळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था, गणेश मंडळांना परवानग्या देणे आणि इतर सुविधा अशा विविध उपाययोजना राबवत आहे. त्यानुसार चहल यांनी सर्व वॉर्ड कार्यालये, झोन कार्यालयांना उत्सवाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. खड्डे बुजवणे आणि पुढील एका आठवड्यात रस्त्यावर खड्डे दिसणार नाहीत याची खातरजमा करणे या निर्देशांमध्ये समावेश आहे.

पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले हे कामाचा आढावा घेऊन अहवाल तयार करतील आणि सहआयुक्त चंद्रशेखर चौरे यांना अहवाल सादर करतील. काम पूर्ण करताना अधिकाऱ्यांना काही अडचण येत असेल तर त्यांनी अतिरिक्त आयुक्त, प्रकल्प पी. वेलारासू यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून व्यवस्था करता येईल, असेही आयुक्त चहल यांनी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे.

शिवाय, धोकादायक स्थितीत असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजवरून गणेश मिरवणूक सुरक्षितपणे घेऊन जाण्याचे आवाहनही बीएमसीने भाविकांना केले आहे. काही धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

करी रोड ब्रिज, चिंचपोकळी स्टेशनवरील पूल, भायखळा स्टेशनजवळील मंडलिक पूल जीर्ण अवस्थेत आहेत आणि 16 टनांपेक्षा जास्त वजन उचलू शकत नाहीत. भाविक आणि मंडळांनी अशा पुलांवर गर्दी न करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन बीएमसीने केले आहे. बीएमसीने मंडळांना आवाहन केले आहे की, त्यांनी भाविकांना पुलावरून नाचू देऊ नये आणि अशा स्थळावरून लवकरात लवकर मिरवणूक पुढे न्यावी. (हेही वाचा: ठाणे महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी 'गणेशोत्सव आरास' स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या नियम व अटी)

बीएमसीने मध्य आणि पश्चिम रेल्वे लाईनवरील धोकादायक पुलांची यादीही जाहीर केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील धोकादायक पूल-

1) घाटकोपर रेल्वे पूल

2) करी रोड स्टेशन

3) चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज

4) भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज

पश्चिम रेल्वे मार्गावरील धोकादायक पूल-

1) मरीन लाईन रेल्वे ओव्हर ब्रिज

2) सँडहर्स्ट रोड ब्रिज

3) ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यान फ्रेंच पूल

4) केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रँट रोड आणि चर्नी रोड दरम्यानचा पूल)

5) फॉकलंड पूल (ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यानचा पूल)

6) मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ बैलासिस पूल

7) महालक्ष्मी रेल्वे ओव्हर ब्रिज

8) प्रभादेवी-करोल रेल्वे ओव्हर ब्रिज

9) दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज