Nagpur: नागपूर येथे दलित तरुणाला बेदम मारहाण; Atrocity कायद्यान्वये गुन्हा दाखल
धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडितास ‘दलित असताना येथे का आला’ अशी विचारणा करत मारहाण केली. मात्र, तत्पूर्वी गाडीला धक्का दिल्याचा आरोप करत आरोपींनी पीडितांसोबत हुज्जत घातली, असे समजते.
नागपूर (Nagpur) येथे मंदिरातील शोभायात्रेहून परत निघालेल्या दलित तरुणाला (Dalit Youth) बेदम मारहाण झाली आहे. या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तरुणाचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी घडली. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडितास ‘दलित असताना येथे का आला’ अशी विचारणा करत मारहाण केली. मात्र, तत्पूर्वी गाडीला धक्का दिल्याचा आरोप करत आरोपींनी पीडितांसोबत हुज्जत घातली, असे समजते. दरम्यान, तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात अप क्र.877/23 कलम 302, 341, 323, 504, 506, 34, भा द वी सह कलम 3 (2)(V) अनु. जा. अनु जमाती प्रती. अधिनियम नुसार गुन्हा नोंद केलेला आहे.
मृत्यू झालेला 21 वर्षांचा तरुण रामटेक तालुक्यातील सीतापूर, दवलापार येथील राहणारा असून, विवेक विश्वनाथ खोब्रागडे असे त्याचे नाव आहे. तर त्याच्यासोबत झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव फैजान खान (पवनी) असे आहे. घटनेनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, विवेक खोब्रागडे आणि त्याचा मित्र फैजान खान हे दोघेही रामटेक येथील प्रसिद्ध गडमंदिर येथे होणारी शोभायात्रा पाहण्यासाठी दुचाकीवरुन रविवारी सायंकाळी गेले होते. शोभायात्रा संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजणेच्या सुमारास ते घरी परतत असताना गडमंदिर मार्गावर आरोपींनी त्या दोघांना अडवले. 'तुम्ही दलित असतानाही येथे कसे काय आलात?' शिवाय तुम्ही आमच्या वाहनालाही धडक दिलीत, असा जाब विचारायला सुरुवात केली. यातून वाद वाढत गेला. आरोपींनी पीडितांकडे वाहनाची नुकसानभरपाई मागितली. यातून दोघांना बेदम मारहाण करण्यात आले. विवेक आणि फैजान यांना मारहाण करुन अर्धमेले केल्यानंतर आरपींनी फैजान याला कुटुंबीयांशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर फैजान याचा भाऊ घटनास्थळी आल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडून ऑनलाईन 10,000 रुपये वळते करुन घेतले आणि ते निघून गेले. (हेही वाचा, Andhra Pradesh: दलित तरुणाला गुंडांकडून बेदम मारहाण, पाणी मागताच अंगावर लघवी; घटनेनंतर समाजात संताप)
दरम्यान, विवेक, फैजान आणि त्याचा भाऊ असे तिघेजण तशाच अवस्थेत घरी परतले. दरम्यानची घटना विवेकच्या वडिलांना समजली. त्यांनी विवेकला कामठी येथील चौधरी हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
आरोपींची नावे
मनीष बंडूजी भारती (37)
जितेंद्र गजेंद्र गिरी (23)
सत्येंद्र गजेंद्र गिरी (25)
सर्व आरोपी अंबाडा वार्ड, रामटेक येथील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी आशीत कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.