Cyclone Nisarga Tracker And Live News Updates: राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले
महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर आज निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. सुमारे 125 किमी वेगाने वार्यासह, अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुधवारी रात्री राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री 10.42 वाजता दक्षिण पूर्व नोएडा येथे हे भूकंपाचे धक्के जाणवले.
महाराष्ट्राच्या रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आणि ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात येत्या अडीच तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेः IMD
रत्नागिरी व श्रीवर्धन येथे वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. मुरुड, मांडगांव, गोरेगाव, अलिबाग, म्हसळा, गुहागर, दापोली तालुक्यातील वीज पुरवठा ईएचव्ही स्थानकांवरून वीजपुरवठा बंद केला होता. वारा व पाऊस थंडावल्यानंतर तो सुरु केला आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे आज सायंकाळपर्यंत झाडे पडण्यासंदर्भात 60 फोन आणि पाणी तुंबल्याबाबत 9 लोकांच्या कॉलला प्रतिसाद दिला- अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका
मुंबईला निसर्ग चक्रीवादळाचा असलेला धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, 'चक्रीवादळ केंद्रबिंदू पासून सरासरी 200 किमी पर्यंत परिणाम करते. वादळाची दिशा पाहता पुणे, नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे.'
तसेच या वादळानंतरच्या कामाची माहिती देताना ते म्हणाले, 'निसर्ग चक्रीवादळ रायगडमधून कर्जतकडे सरकले आहे. आतापर्यंत सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.'
सध्या निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात, अलिबागपासून पूर्वे-ईशान्य दिशेला 100 किमी, मुंबईपासून 90 कि.मी. पूर्वेकडे आणि पुण्याच्या उत्तर-वायव्य दिशेला 50 किमी अंतरावर केंद्रित आहे. गेल्या 6 तासात 23 किमी प्रतितास वेगाने ते ईशान्य दिशेने पुढे सरकले आहे.
सध्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका जरी मुंबईवरून टळला असला तरी, यामुळे झालेल्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागांचे नुकसान केले आहे.या वादळाच्या पावसामुळे मुंबईच्या बीकेसी येथे बांधलेल्या कोरोना व्हायरसच्या जम्बो रुग्णालयात पाणी शिरले आहे. नितेश राणे यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
रायगड मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे कोसळलेली झाडं हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. प्रशासन, पोलिस यांच्याकडून रस्ता पुना पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे.
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकले आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आज रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतर अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अलिबाग नजिक रामराज येथे विजेची डीपी पडल्याने एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याचेही चित्र आहे.
मुंबईवरील निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्रीपर्यंत पाऊस बसरू शकतो. वार्याचा वेग देखील ताशी 50 किमी प्रति तास असू शकते.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड मध्ये काही ठिकाणी मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे. काही तासांपूर्वी रायगडच्या किनार्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकलं आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला आज (3 जून) निसर्ग चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोकणासह मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफची पथक सज्ज आहे. आज दुपारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ निसर्ग चक्रीवादळ धडकू शकतं असा आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात वार्याचा वेग 125 kmph असेल तर पश्चिम किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता आहे. सध्या हे अलिबाग पासून 155 किमी साऊथ साऊथ वेस्ट, तर मुंबई पासून अंदाजे 200 किमी साऊथ साऊथ वेस्ट दिशेला आहे. महाराष्ट्रासह गुजरातच्या दक्षिण भागातही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मुंबई सोबतच कोकण किनारपट्टीवर राहणार्यांना लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान तात्पुरता निवारा घेण्यासाठी शेड किंवा कच्चं बांधकाम असलेल्या ठिकाणी नागरिकांनी आसरा घेऊ नये. सुरक्षित ठिकाणी रहावं असा सल्ला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबईमधून आज विमान आणि रेल्वे गाड्यांच्या येण्या- जाण्यावरही बंधनं घालण्यात आली आहे. अनेक नियोजित विमानप्रवास, रेल्वे प्रवास रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावं असं कळकळीचं आवाहन आहे. सोबतच मुंबई, रायगड आणि पालघर भागामध्ये कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)