मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकावरील मोफत वाय-फाय सेवेचा (Free Wi-Fi) वापर केल्यानंतर एका बनावट एपीके फाईलमुळे बँक ऑफ बडोदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल चार लाख सत्तावीस हजार रुपयांचा फटका बसला आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फोर्ट भागातील बँक ऑफ बडोदाच्या कार्यालयात जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आणि वडाळ्यातील भक्ती पार्क येथे राहणारे 56 वर्षीय गोविंद बिस्वास हे या फसवणुकीचे बळी ठरले. 18 जुलै रोजी त्यांच्या स्वीय सहायकाने नारायण स्वामी यांनी सीएसएमटी स्थानकावर उपलब्ध असलेल्या मोफत वाय-फाय नेटवर्कशी आपला मोबाईल जोडला. पोलिसांच्या तपासानुसार, याच वेळी सायबर गुन्हेगारांनी स्वामी यांच्या फोनमध्ये शिरकाव केल्याचा संशय आहे.
बनावट चलनाच्या नावाखाली फसवणूक
फोन हॅक झाल्यानंतर त्यातून आपोआप 'आरटीओ चलन एपीके' या नावाची संशयास्पद फाईल स्वामी यांच्या फोनमधील सर्व संपर्कांना पाठवली गेली. ही फाईल आपल्या स्वीय सहायकाकडून आलेली असल्याने बिस्वास यांनी ती खरी आरटीओ चलन सूचना समजून कोणतीही खातरजमा न करता डाऊनलोड आणि इन्स्टॉल केली. फाईल इन्स्टॉल होताच त्यांचाही फोन बाधित झाला आणि तीच फसवी फाईल त्यांच्या संपर्कांनाही पुन्हा पाठवली गेली.
संशय आल्यानंतरही उशीर
२१ जुलै रोजी आपल्या फोनमध्ये काहीतरी असामान्य घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर बिस्वास यांनी ती एपीके फाईल फोनमधून डिलीट केली. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून कोणताही व्यवहार झाल्याची सूचना त्यांना मिळालेली नव्हती. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून अनधिकृत व्यवहार झाल्याचे उघडकीस आले, आणि तोपर्यंत त्यांच्या खात्यातून चार लाख सत्तावीस हजार रुपये परस्पर वळते झाले होते.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. मोबाईल फोन नेमका खऱ्याखुऱ्या मोफत वाय-फाय नेटवर्कमधूनच बाधित झाला, की गुन्हेगारांनी अस्सल नेटवर्कसारखे भासणारे बनावट हॉटस्पॉट तयार करून फसवणूक केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
नागरिकांसाठी इशारा
सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोफत वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. अनोळखी स्रोतांकडून आलेल्या एपीके फाईल्स किंवा लिंक्स कोणतीही खातरजमा न करता डाऊनलोड करणे टाळावे, तसेच अशा संशयास्पद फाईल्स ओळखीच्या व्यक्तीकडून आल्या असल्या तरी त्याबाबत संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करूनच पुढील कृती करावी, असा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.