CSM Hospital Deaths: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 2023 मध्ये सात महिन्यांत तब्बल 1,061 मृत्यूंची नोंद; अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच्या वतीने 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
ठाणे (Thane) येथील कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज (CSM) रुग्णालयात चार दिवसांत तब्बल 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सध्या हे रुग्णालय चर्चेत आले आहे. आता सीएसएम रुग्णालयात 2023 च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत तब्बल 1061 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. महत्वाचे म्हणजे 2022 च्या तुलनेत यंदा 325 रुग्णांचे जास्त मृत्यू झाले आहेत. गेल्या 14 दिवसांत इथे 50 हून अधिक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्रति हजार रुग्णांचा सरासरी मृत्यू दर 51 ते 54 आहे.
कळवा रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह पालघर, मुंबई येथून रुग्ण उपचारासाठी येतात. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयावरील ताण प्रचंड वाढला आहे. बाह्यरुग्ण विभागात (OPD) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या 1500 वरून 2000 वर गेली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी या ठिकाणी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत आणखी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. नंतर सोमवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला.
जानेवारी ते जुलै 2023 या सात महिन्यांत या रुग्णालयात 1061 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 2022 मध्ये या रुग्णालयात जानेवारी ते जुलैपर्यंत 736 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी जानेवारी 2022 ते जुलै 2022 या सात महिन्यांच्या कालावधीत 16 हजार 969 रुग्ण विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी इथे दाखल झाले होते. त्यापैकी 14 हजार 626 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यातील 3,242 प्रसूती होत्या. यासह 2022 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत एकूण 1336 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: Uttar Pradesh: राजभवनच्या गेटबाहेर गर्भवती महिलेने दिला बाळाला जन्म; रुग्णवाहिका न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू; Watch Video)
यावर्षी जानेवारी 2023 ते जुलै 2023 पर्यंत 21,606 रुग्णांना शस्त्रक्रियेसह विविध आजारांवर उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील 18,413 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यापैकी 3,265 प्रसूती झाल्या. या कालावधीत एक हजार 61 रुग्णांचा मृत्यू झाला. कळवा रुग्णालयात डायलिसिससाठी जागा खासगी संस्थेला देण्यात आली आहे. तसेच सीटी स्कॅन व इतर चाचण्यांसाठीदेखील खासगी संस्थेला जागा देण्यात आली आहे. येथे कमी खर्चात सिटी स्कॅन केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, रुग्णालयातील अनेक भाग खासगी संस्थांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर ते उठवण्यात आले.
दरम्यान, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवार, 13 ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, 14 ऑगस्ट रोजी रुग्णालयाला भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच्या वतीने 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.