Covid-19 Vaccination in Maharashtra: जाणून घ्या कसा असेल महाराष्ट्रातील कोरोना विषाणू लसीकरणाचा कार्यक्रम; मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी
लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
गेले 9 ते 10 महिने भारतामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) धुमाकूळ सुरु आहे. या महामारीशी लढण्यासाठी आतापर्यंत सरकार वेळोवेळी उपयोजना करीत आले आहे. सध्या जगातील अनेक कंपन्या या विषाणूबाबतच्या लसी बनवत आहेत व त्यामुळे लवकरच या महामारीचे सावट संपेल अशी चिन्हे दिसत आहेत. आज महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणासाठी (Covid-19 Vaccination) मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. लसीकरणासाठी विविध स्तरावर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.
लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.
दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
लसीकरणासाठी राज्य शासनाने तयारी केली असून आतापर्यंत शासकीय आरोग्य संस्थेतील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पूर्ण करण्यात आला आहे. तर खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा डेटा 78 टक्के पूर्ण झाला आहे. सुमारे दोन लाख 60 हजार शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण पथकामध्ये पाच सदस्यांचा समावेश असेल.
राज्यात शीतगृहांची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हास्तरावर 34, महामंडळांचे 27 असे शीतगृह तयार असून 3 हजार 135 साखळी केंद्र उपलब्ध आहेत.
निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मतदानासाठी ज्याप्रकारे बूथ असतो तसे बूथ लसीकरणासाठी करण्यात येतील आणि लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला त्या बूथमध्ये ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाईल. लसीकरणानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संदेश येईल आणि क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्रदेखील पाठविण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी 100 जणांना लसीकरणाची व्यवस्था होईल.
फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणासाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालये, शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी तर तिसऱ्या गटातील व्यक्तींना लसीकरणासाठी दवाखाने, शाळा, समाजमंदिर, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाईल.