Covid-19 Vaccination in Thane: ठाण्यातील लसीकरण उद्या बंद; महापौर नरेश म्हस्के यांची माहिती

लसींचा साठा संपल्याने उद्या ठाण्यातील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

Covid-19 Vaccination | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढत असताना लसींचा अपुऱ्या साठ्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. लसींचा तुटवडा ठाणे (Thane) शहरातही जाणवत आहे. दरम्यान, लसींचा साठा संपल्याने उद्या ठाण्यातील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के (Mayor Naresh Mhaske) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. लसींचा साठा संपल्यामुळे महापालिका लसीकरण केंद्रावर उद्या (गुरुवार, 29 एप्रिल) लसीकरण बंद राहील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर 'आमची पूर्ण तयारी आहे आता तुम्ही कमी पडू नका' असे PMO India ट्विटर हँडलला टॅग करत त्यांनी म्हटले आहे.

तसंच व्हिडिओ शेअर करतही त्यांनी ठाण्यातील लसीकरणबाबतची परिस्थिती सर्वांसमोर मांडली आहे. ठाण्यात आतापर्यंत 2 लाख 24 हजार जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 61 हजार 836 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. ठाणे महानगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने लसीकरण करत आहे. परंतु, लसींचा पुरवठा झाला तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने लसीकरण करु शकतो. ठाण्यात 42 महानगरपालिकेची केंद्र असून 14 खाजगी केंद्र आहेत. त्यामुळे लसींचा योग्य पुरवठा झाल्यास दिवसाला 40-50 हजार लसीकरण करण्याची पालिकेची क्षमता आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.

महापौर नरेश म्हस्के ट्विट:

केंद्राने महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि कोरोना प्रादुर्भाव पाहता अधिकाधिक लसी द्यायला हव्यात, असेही ते म्हणाले. ठाण्यात कोरोना रुग्णांसाठी चांगल्या सोयी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Corona Vaccination In Maharashtra: निर्णय होऊनही 18 ते 44 वयोगटासाठी महाराष्ट्रात 1 मेपासून लसीकरण सुरु होणार नाही- राजेश टोपे)

दरम्यान, कोविड-19 लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे मुंबई मधील 40 खाजगी लसीकरण केंद्र उद्या बंद होतील. उर्वरीत 33 खाजगी केंद्रांमध्येही लसींचा साठा मर्यादीत असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.