पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात दर्शनापूर्वी Covid-19 Test अनिवार्य

त्यातच पंढरपूरातील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देखील कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Pandharpur Vitthal Mandir (Photo Credits: Facebook)

राज्यातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संकटामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंधांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पंढरपूरातील (Pandharpur) विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देखील कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Mandir) समितीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर तोंडावर मास्क असणे आणि हातांवर सॅनिटायजरची फवारणी करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यातील विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसंच राज्यातील कोरोना सुपरस्प्रेडर टॉप टेन शहरांमध्ये सोलापूरचाही समावेश झाला आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून 5 एप्रिलपासून कोरोना चाचणी झाल्यावरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराच्या समोरच संत ज्ञानेश्वर सभामंडपात भाविकांच्या अँटी जेन टेस्ट करण्यात येणार आहे.

राज्यात मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. लसीकरण सुरु झाले असेल तरी अद्याप धोका टळलेला नाही. गेल्या वर्षी तब्बल 8 महिने मंदिरं बंद होती. त्यानंतर विशेष नियमांसह मंदिरं खुली करण्यात परवानगी देण्यात आली. मात्र धार्मिक सोहळे, यात्रा, उत्सव यावरील निर्बंध कायम होते. आता पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याने विठ्ठल मंदिर समितीने कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pandharpur Maghi Yatra 2021 भाविकांशिवाय साजरी होणार; शहरासह 10 गावांत संचारबंदी लागू)

दरम्यान, कालच्या अपडेटनुसार,  राज्यात 43,183 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 249 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32,641 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या नव्या वाढीनंतर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहचला असून 54,898 मृतांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 3,66,533 सक्रीय रुग्ण असून 24,33,368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.