Corruption Cases in Maharashtra: महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 टक्के वाढ, पहा आकडेवारी

अहवालानुसार, 2022 च्या तुलनेत यावर्षी 25 डिसेंबरपर्यंत नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Corruption Cases in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये भ्रष्टाचाराच्या (Corruption) प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) च्या वेबसाईटद्वारे ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, 2022 च्या तुलनेत यावर्षी 25 डिसेंबरपर्यंत नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो वेबसाइटवर अपलोड केलेल्या 1 जानेवारी ते 25 डिसेंबर 2023 दरम्यानच्या सांख्यिकीय नोंदींवर एक नजर टाकल्यास असे दिसून येते की, 2022 मध्ये याच कालावधीतील 749 प्रकरणांच्या तुलनेत यंदा 801 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

यावर्षी समोर आलेल्या 801 प्रकरणांमध्ये, 784 सापळे रचून गुन्हेगारांना पकडण्यात आलेली प्रकरणे, 12 बेहिशोबी मालमत्ता (Disproportionate Asset- DA) प्रकरणे आणि इतर पाच भ्रष्टाचार संबंधित गुन्हे आहेत. 2023 मध्ये सापळ्यात अडकलेल्या व्यक्तींची संख्या 94 ने वाढली आहे (1,002 वरून 1,096 वर).

यामध्ये महसूल-जमीन अभिलेख शाखा विभागात सर्वात जास्त, 194 सापळे रचून गुन्हेगारांना पकडण्यात आले. नंतर 143 लाच प्रकरणांसह पोलीस खाते दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंचायत समिती सदस्यांविरुद्ध 79 सापळे प्रकरणे नोंदवले गेले, त्यानंतर राज्य वीज वितरण कंपनी आणि महापालिका यांच्याशी संबंधित अनुक्रमे 47 आणि 49 प्रकरणे नोंदवली गेली. (हेही वाचा: ST Bank News: एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्ते यांना धक्का)

सापळ्यांदरम्यान जप्त केलेली रक्कम 4.59 कोटींपेक्षा जास्त आहे. आरोपी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अनुक्रमे 54 वर्ग I अधिकारी, 131 वर्ग II अधिकारी, 587 आणि 50 वर्ग III आणि IV कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय 98 निवडून आलेले प्रतिनिधी आणि 176 मध्यस्थांवर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भ्रष्ट व्यवहार आणि सत्तेच्या गैरवापर करत असलेल्या लोकांच्या विरोधात तक्रारी दाखल करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी, लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने acbmaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासह टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1064 देखील सुरू केला आहे.