Coronavirus: उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून तब्बल 1,07,000 हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून वसूल
मात्र त्यात आता वाढ करण्यात आली असून तो 1 हजार रुपये केला आहे
राज्यात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नसून काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 40 च्या पार गेला आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून यापूर्वी 200 रुपयांचा दंड वसूल केला जाणार होता. मात्र त्यात आता वाढ करण्यात आली असून तो 1 हजार रुपये केला आहे.कोरोना व्हायरसबाबत काळजी घेत मुंबई महापालिकेने उघड्यावर थुंकणाऱ्या एकूण 107 जणांकडून तब्बल 1,07,000 हजार रुपयांच्या दंडाची वसूली केली आहे. ऐवढेच नाही तर 46 जणांना उघड्यावर थुंकल्यास कारवाई करु असा इशारा दिला आहे.
तसेच महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार, जिम, मॉल, गिरणी कंपाऊंड, स्पा सेंटर, क्लब, पब, डिस्को, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि इतर करमणूक उद्याने मुंबईत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचसोबत शाळा-महाविद्यालये येत्या 31 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. (रत्नागिरीमध्ये Coronavirus रुग्णाची पुष्टी; राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 45 वर; सरकारने घेतले काही महत्वाचे निर्णय)
पुण्यात अजून एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सदर महिलेने फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्स येथून प्रवास करुन भारतात दाखल झाली होती. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत माहिती दिली आहे. तसेच भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा आकडा 140 च्या पार गेला आहे. यापैकी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.