Coronavirus in Pune: पुण्यातील BJP आमदार मुक्ता टिळक व आईला कोरोना विषाणूची लागण; घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला

आता पुण्यातील भाजपच्या आमदार व माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि त्यांच्या आईला कोरोना विषाणूची लागणं झाली आहे.

मुक्ता टिळक (संग्रहित संपादित प्रतिमा)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या अनेक नेते मंडळींनाही या विषाणूने ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे (Pune) महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. आता पुण्यातील भाजपच्या आमदार (BJP MLA) व माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि त्यांच्या आईला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः मुक्ता टिळक यांनी सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली असल्याची माहितीही मुक्ता टिळक यांनी दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मुक्ता टिळक म्हणतात, ‘आज माझी आणि माझ्या आईची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे. सध्या तरी आम्हा दोघींमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. डॉक्टरांनी आम्हाला घरातच वेगळे राहण्याचा सल्ला दिला आहे. कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची चाचणी नकारात्मक आली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.’ मुक्ता टिळक या पुण्याच्या माजी महापौर आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

मुक्ता टिळक ट्वीट -

यापूर्वी महापालिकेचे सहा नगरसेवक कोरोना ने बाधित झालेत तर आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा अधिक कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित आहेत. महापौर बाधित झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि शांतनू गोयल हेदेखील होम क्वारंटाईन आहेत. यासह हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली. (हेही वाचा: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ कुटुंबीयांनाही कोरोना विषाणूची लागण; आतापर्यंत 8 जणांचे रिपोर्ट्स सकारात्मक)

दरम्यान, लोणावळ्यात, 130 हून अधिक पर्यटकांवर परमिटशिवाय प्रवास केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणावळ्यात पर्यटन-बंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नसतील, तर नियम अजून कठोर करावे लागतील अशा इशारा पुणे जिल्हा प्रशासनाने दिला आहे.