Coronavirus in Mumbai: यापुढे मुंबईमध्ये कोरोना विषाणू चाचणी करून घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही; BMC ने जारी केली नवी मार्गदर्शक सूचना
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोरोना चाचणीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार आता कोरोना विषाणू चाचणी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता भासणार नाही.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोरोना चाचणीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार आता कोरोना विषाणू चाचणी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची (Prescription) आवश्यकता भासणार नाही. आजपासून मुंबईत नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. शहरातील कोरोना चाचणीची आकडेवारी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक, मुंबईतील लॅबमध्ये दररोज दहा हजार कोरोना चाचणी घेण्याची क्षमता आहे, परंतु आता बीएमसी दररोज फक्त 5 हजार चाचान्याच करत आहे.
पहा आदित्य ठाकरे ट्वीट -
या निर्णयामुळे ज्या लोकांना स्वतःहून कोरोना चाचणी करून घ्यायची होती, त्यांना दिलासा मिळाला आहे. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, ‘बीएमसीने मुंबई शहरातील कोणत्याही व्यक्तीची प्रिस्क्रिप्शनशिवाय चाचणी घेण्याचे ठरविले आहे. कोणत्याही व्यक्तीची इच्छा असल्यास, आयसीएमआर (ICMR) मार्गदर्शक सूचनांनुसार लॅब आता आरटी पीसीआर (RT PCR) चाचण्या घेऊ शकतात. कोणत्याही नागरिकाला शंका असल्यास, विलंब न करता त्याला चाचणी करण्यात यावी यासाठी हे मदत करेल.’ (हेही वाचा: मुंबईमध्ये आज 806 जणांना कोरोना विषाणूची लागण; एकूण संक्रमितांची संख्या 86,132 वर)
कोरोना साथीदरम्यान प्रथमच मुंबईमध्ये इच्छा असेल त्याला कोरोना चाचणी करून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत, केवळ कोरोना लक्षणे किंवा हाय रिस्क असलेल्यांनाच कोरोनाची चाचणी करून घेण्याची परवानगी होती. नुकतेच केंद्र सरकारने एक चेतावणी दिली होती की, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश क्षमतेनुसार कोरोनाची चाचणी घेत नाहीत. त्यानंतर, मुंबई महानगरपालिकेने कोरोना टेस्टच्या अटी शिथिल केल्या आहेत.
बीएमसीने असेही सांगितले आहे की, कोविड-19 चाचणी (फक्त आरटी-पीसीआर) साठी होम स्वॅब कलेक्शनही (Home Swab Collections) होऊ शकते आणि त्यासाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची आवश्यक नाही. यासाठी बीएमसीने 17 खासगी लॅबची यादी जाहीर केली आहे.